रत्नागिरी : जमिनीमध्ये विभागवार पर्जन्यमान व हवामानानुसार विविध समस्या आढळून येतात. माती परीक्षणावरून व पीक उत्पादन क्षमतेनुसार समस्यायुक्त जमिनी ओळखता येतात. समस्यायुक्त जमिनीमध्ये खते व अन्नद्रव्ये व्यवस्थापनात बदल केल्यास उत्पादकता वाढू शकते. समस्यायुक्त जमिनींचे आरोग्य सुधारविण्यासाठी तज्ञांकडून काही गोष्टींची शिफारस करण्यात येते. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, पिकांची फेरपालट करून कडधान्य पिकांचा समावेश केल्याने पालापाचोळा जमिनीत पडून सेंद्रिय पदार्थांचे चक्रीकरण होते. तसेच सेंद्रिय खते शेणखत, शहरी कंपोस्ट, गांडूळखत दरवर्षी पिकांना शिफारशीप्रमाणे जमिनीतून द्यावे. माती परीक्षणानुसार खतांचा समतोल वापर अपेक्षित उत्पादन समीकरणाद्वारे केल्यास जमिनीच्या सुपिकतेबरोबर जमीन आरोग्यही चांगले राहील.
माती परीक्षणाद्वारे कमतरतेनुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून सेंद्रिय खतात मिसळून करावा. माती परीक्षण करून विद्राव्य खतांद्वारे ठिबक सिंचनातून अन्नद्रव्ये पीक वाढीच्या अवस्थेत गरजेनुसार द्यावीत. पाण्याचा अमर्याद वापर न करता बागायत क्षेत्रामध्ये ठिबक, तुषार तसेच मायक्रोस्प्रिंकलर पद्धतीचा वापर वाढवावा. मृद व जलसंधारणाची उपाययोजना लोक सहभागातून कोरडवाहू भागात शासनाच्या मदतीने वाढविणे गरजेचे आहे, कारण पावसाचा
प्रत्येक थेंब हा जमिनीत मुरविला गेला पाहिजे पाहिजे.
शेततळी तयार करून संरक्षित पाण्याचा उपयोग करावा. बागायत क्षेत्रात दोन ते तीन वर्षातून एकदा तरी हिरवळीची पिके म्हणजे धैंचा किंवा ताग गाडला गेला पाहिजे. क्षारपड जमिनीचे क्षेत्र सुधारण्यासाठी एकात्मिक पद्धतीने पाणलोट क्षेत्रात जिप्सम शेणखतात मिसळून जमिनीत टाकावे. जादा पाण्याचा
चर काढून निचरा करावा, क्षार प्रतिकारक पिकांची लागवड करावी. पश्चिम महाराष्ट्रातील हलक्या जमिनीचे क्षेत्र ठिबक सिंचनावर आणून कोरडवाहू फळबाग लागवड करणे गरजेचे आहे.
जास्त पाणी कमी क्षेत्रावर देण्याऐवजी कमी पाणी जास्त क्षेत्रावर विभागून दिल्यास जमिनी खराब होणार नाहीत, उत्पादनात वाढ होईल आणि सामाजिक समतोल राखला जाईल. शेतकर्यांनी आपल्याकडील असलेल्या जमिनीची ‘आरोग्य पत्रिका’ तयार करून जमीन सुधारणा व पीक पद्धतीचे नियोजन करावे. शेतातील उरलेले पीक अवशेष न जाळता त्यांचा आच्छादन म्हणून उपयोग करावा किंवा बारीक तुकडे करून जमिनीत मिसळावे, म्हणजे जमिनीत सेंद्रीय कर्ब वाढविण्यास मदत होईल. पर्यायाने सूक्ष्मजिवाणुंची संख्या वाढेल.