औरंगाबाद : अपेक्षेपेक्षा जास्त वेळ पाऊस लांबल्याने जुन महिना संपत आला तरी खरीपाच्या पेरण्या अद्यापही रखडलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकर्यांना योग्य नियोजन करावे लागणार आहे. कारण कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे? याचे सुक्ष्म नियोजन केले तरच शेतकर्यांच्या पदरात काहीतरी पडेल. यासाठी शेतकर्यांनी वाणाची निवड, बीजप्रक्रिया आणि जमिनीतील ओलावा या बाबी लक्षात घेऊनच पेरणी केली तर फायद्याचे ठरणार आहे. (Sowing Delayed : Advice from Agriculture Department)
साधारणत: पेरणीचे गणित पाहिल्यास, हंगामाच्या सुरुवातीला कडधान्यांचा पेरा त्यानंतर कापूस आणि सोयाबीनची लागवड केली जाते. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने पेरणीचे गणित बिघडले आहे. पाऊस लांबल्यामुळे आता कडधान्यामध्ये मूग, उडदाची पेरणी केली तरी उत्पादनात वाढ होणार नाही. त्यामुळे शेतकर्यांना कमी कालावधीनुसार येणारे सोयाबीनचे वाण, बीजप्रक्रिया आणि प्रत्यक्ष पेरणी करताना जमिनीतील ओल पाहून नियोजन करावे लागेल.
जूनच्या अंतिम टप्प्यात ७५ मिमी पाऊस झालेल्या क्षेत्रावर कापूस आणि सोयाबीनचा पेरा करण्यात येत आहे. सोयाबीन, कापसासह बाजरी, तूर, एरंडी, धने, एरंडी तीळ या पिकांची पेरणी ३१ जुलैपर्यंत शेतकर्यांना करता येणार आहे. त्यामुळे योग्य वातावरण आणि पाऊस झाल्यास या पिकांच्या उत्पादनात घट होणार नसल्याचे कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. कापसाच्या दरामुळे यंदा क्षेत्र वाढेल असा अंदाज होता पण पावसाने पेरणीचे गणित बिघडल्याने मराठवाड्यात सोयाबीनचेच क्षेत्र वाढणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.