नाशिक : पुणतांबा येथे शेतकर्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला आता हळूहळू सर्वत्र पाठिंबा मिळू लागला आहे. पुणतांबा येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बागलाणच्या मुंजवाड येथेही धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनाला सुरवात झाली आहे. पाच दिवस धरणे आंदोलन आणि त्यानंतर शेतकरी आपली भूमिका मांडणार आहेत. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पध्दतीने राज्य सरकारचा निषेध केला जात आहे. गुरुवारी दुसर्या दिवशी शेतकर्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी ज्या शेतीमालाचे दर कवडीमोल आहेत त्याचे मोफत वाटप केले होते. आंदोलकांनी कांदा, कलिंगड आणि द्राक्षाचे वाटप केले होते. तिसर्या दिवशीही शासानाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यापूर्वी २०१७ मध्ये राज्यभरातील शेतकर्यांनी या आंदोलनाला जसा पाठींबा दिला होता तसाचा पाठिंबा यंदाही मिळतांना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील मुंजवाड येथेही धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील शेतकरी याठिकाणी एकवटले असून शेतकर्यांच्या मागण्या ते ठाम आहेत. प्रशासनाने आंदोलनाची दाखल घेत योग्य निर्णय न घेतल्यास पुढील पाच दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुंजवाडच्या आंदोलकांनी इशारा दिला आहे.
मुंजवाड येथे धरणे आंदोलन सुरु करण्यापूर्वी परिसरातील १५ गावच्या ग्रामसभेत ठराव संमत करुन आंदोलनाची दिशा ठरवली आहे. शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर एकमत झाल्यानंतर त्यासंदर्भात आवाज उठवण्यासाठी शेतकर्यांनी ही भूमिका घेतली आहे. हेच लोण आता राज्यभर पसरतांना दिसत आहे. आंदोलन जरी केवळ पुणतांबा येथील शेतकर्यांनी सुरु केले असले तरी या समस्या संपूर्ण राज्यातील शेतकर्यांच्या आहेत. यामुळे राज्य शासनाने याकडे गांभीर्यांने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.