पुणे : केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जूनपासून ही बंदी घालण्यात येणार आहे. वाढती महागाई आणि खाद्य सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला आहे. या पूर्वी देशांत गव्हाची भाव वाढल्याने केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
देशात ऊसाचे क्षेत्र आणि उत्पादनही दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा तर विक्रमी उत्पादन झाले आहे. चालू वर्षात देखील १८ मे पर्यंत ७५ लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे. गतवर्षी ७० लाख टन साखरेची निर्यात झाली होती. म्हणजेच गतवर्षीपेक्षा यंदा उत्पादनात तर वाढ झालीच आहे. यंदा ९० लाख टन साखरेची निर्यात करण्याचा अंदाज होता. ब्राझिलनंतर भारत हा साखरेचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. भारताने चालू मार्केटिंग वर्षात ८५ लाख टन साखरेच्या निर्यातीचा निर्णय घेतला होता.
भारतामधून इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, यूएई, मलेशिया आणि आफ्रिकन देशात निर्यात होते. हे निर्यातीबद्दल झाले तर एकूण उत्पादनापैकी ८० टक्के साखरेचे उत्पादन हे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातून होते. याशिवाय ऊस उत्पादक राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, हरियाणा आणि पंजाब या राज्यांचाही समावेश आहे.