मुंबई : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेत ऊस उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. एफआरपीमध्ये क्विंटलमागे १५ रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. केंद्र सरकार उसाच्या रास्त व किफायतशीर दरात वाढ करण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकारने गुरुवारी यासंदर्भातील कॅबिनेट नोट जारी केली आहे.
ज्या प्रमाणे शेतीमालाला आधारभूत दर ठरवून दिलेला आहे त्याप्रमाणेच केंद्राने जो ऊसाचा दर ठरविला आहे त्याला एफआरपी म्हणतात. ऊसाचा दर ठरविण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचाच असतो. उसाची एफआरपी ही उसाच्या किमान आधारभूत किंमती सारखीच आहे. नुकताच ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना केंद्राने हा निर्णय घेऊन कोट्यावधी ऊस उत्पादकांना दिलासा दिला आहे.
उसाची एफआरपीरक्कम वाढवण्याबाबत केंद्र सरकार पावले उचलण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने संबंधित कॅबिनेटला तशा सूचनाही जारी केल्या आहेत. त्यामुळे देशभरातील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून क्विंटलमागे एफआरपी रक्कम ही २९० प्रमाणे मिळत होती. आता यामध्ये १५ रुपयांची वाढ होणार असल्याने शेतकर्यांना प्रति क्विंटल ३०५ रुपये मिळणार आहेत.
असे असले तरी त्या-त्या राज्यावर सर्वकाही अवलंबून आहे. राज्यांनी या नियमांची अंमलबजावणी केली तरच शेतकर्यांना याचा फायदा होणार आहे. विशेषत: महाराष्ट्रात ऊसाचे क्षेत्र आणि उत्पादन दोन्ही विक्रमी होत असून केंद्राने ठरवलेला निर्णय राज्याने लागू केला तर सर्वाधिक फायदा महाराष्ट्रातील शेतकर्यांना होणार आहे.