महाड : वरंध गावातील एका महिलेने परसबागेला आधुनिक शेतीची जोड देत विविध भाज्यांचे उत्पादन घेत कुटुंबाला आधार दिला आहे. सौ.सारिका सुनील कोंडाळकर (वय ४३) असे त्यांचे नाव. नी गावातील महिलांना देखील प्रोत्साहित करण्यासाठी महिला बचत गटाची निर्मिती केली आहे.
उन्हाळ्यात परसबागेतील पाण्यावर तोंडली, भेंडी, आणि गवार काढली जाते. तोंडलीचा वेल मांडवावर पसरला असून मोठ्या प्रमाणात तोंडली काढली जातात. याच्याच जवळ अर्धा गुंठे परिसरात अळूच्या पानांची लागवड केली आहे. आज या अळूच्या पानांची बाग तयार झाली आहे. अळूच्या पानांना मोठी मागणी देखील आहे. ऐन पावसाळ्यात विविध सणासुदीला अळूची पाने आणि त्यातून तयार केलेल्या अळूच्या वड्यांना मागणी आहे. याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय देखील सारिका कोंडाळकर करतात. यातून महिना सात ते आठ हजार उत्पन्न मिळते.
कृषी विभागअंतर्गत ५० हापूस आंबा लागवड देखील करण्यात आली आहे. सारिका कोंडाळकर इथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी गावातील महिलांना देखील प्रोत्साहित करण्यासाठी महिला बचत गटाची निर्मिती केली आहे. या सगळ्या माध्यमातून सारिका कोंडाळकर यांची यशस्वी वाटचाल सुरु असून परसबागेला आधुनिक शेतीची जोड देत कुटुंबाला आधार देत आहेत.
महापूर किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीच्या काळात सामाजिक जीवन विस्कळित होते, कुटुंबे उद्ध्वस्त होतात. त्या ठिकाणी अशा कुटुंबांचे पुनर्वसन होण्यासाठी ‘परसबागेतील शेती’ हा मोठा आसरा होऊ शकतो. त्यातून ही कुटुंबे सावरली जाऊ शकतात, त्यांची अन्नसुरक्षा ती मिळवू शकतात, असे अन्न आणि कृषी संघटनेचे म्हणणे आहे.