पुणे : सुर्य आग ओकत असल्याने महाराष्ट्रात तापमानाचा पारा सरासरी ४४ ते ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. उन्हाचा परिणाम केवळ मानवावरच नव्हे तर जनावरांवर देखील होत असतो. या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी आपल्या दुभत्या जनावरांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. कारण उन्हाळ्यात दूध देण्याचे प्रमाण कमी होत असते. याकरीता दुभत्या जनावरांसाठी कशा प्रकार काळजी घ्यायला हवी, याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
शेतकर्यांना एक गोष्ट पक्की माहिती आहे की, उन्हाळ्यात म्हशींच्या अंगाची लाहीलाही होते. यामुळे शरिराला गारवा मिळावा यासाठी म्हशी पाण्याची डबकी किंवा ज्या परिसरात गारवा असतो त्या एकाच ठिकाणी थांबून असतात. यामुळे तिची हालचाल कमी होते परिणामी दूध देण्याचे प्रमाणही घटते.
असा द्या खाद्य आहार
उन्हाळ्यात हिरव्या चार्याचीही कमतरता असते. यामुळे जनावरांना केवळ कडबा आणि बुस्कट हेच खाद्य द्यावे लागते. हे खाद्य देतांना ते एकाचवेळी न देता दिवसभरात समान विभागणी करून ३ ते ४ वेळेस द्यावे. चार्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. चारा तसाच टाकला तर ३० टक्के वाया जातो. हिरवा चारा उपलब्ध असल्यास वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडाल्याने जनावरे अधिक आवडीने चारा खातात. शिवाय जनावरांना पाणी पाजतांना ते शक्यतो थंड द्यावे. यासाठी मोठा माठ किंवा रांजणातील पाण्याची व्यवस्था करावी. पाण्याची उपलब्धता पाहून दिवसभरातून एकदा त्यांना धुवून काढावे शिवाय सकाळी किंवा संध्याकाळी त्यांना चरण्यासाठी हिंडवावे, याचा दूधवाढीसाठी सकारात्मक परिणाम होतो.