जळगाव : राज्यात कापसाची सर्वाधिक लागवड जळगाव जिल्ह्यात होते. राज्यभरात पाऊस काहिसा लांबल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र गत तीन-चार दिवसांपासून पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने पेरण्यांना वेग आला आहे. राज्यातही बहुतांश जिल्ह्यांमध्ये अशीच काहीशी परिस्थिती आहे. काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे राज्यातील विविध भागात शेतकर्यांनी पेरणीची लगबग सुरू केली.
कापसाची लागवड करतांना तज्ञांनी दिलेले सल्ले :
१) कपाशीवर पडणार्या बुरशीजन्य रोगापासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी बीजप्रकिया आवश्यक असते. बीजप्रक्रियेसाठी कार्बोक्झिन ३७.५ टक्के अधिक थायरम ३७.५ टक्के डी.एस. ३.५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बियाण्यांना लावावे.
२) पेरणीपूर्वी उगवलेल्या तणाच्या नियंत्रणासाठी पेंडीमिथॅलिन (३८.७ टक्के सी.एस.) ७०० मि.लि. प्रति एकर फवारणी करावी.
३) पेरणीनंतर उगवलेल्या तणाच्या नियंत्रणासाठी पायरीथिओबॅक सोडीअम (१० टक्के इसी) १२. ५ ते १५ मिली प्रति १० लिटर पाणी प्रमाणे फवारावं.
४) बागायती कपाशीला पेरणीच्या वेळी खतांचा डोस दिला नसेल तर ३० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाश रिंग पद्धतीने किंवा छिद्र पाडून मुळाजवळ द्यावा.
५) कपाशीवर गुलाबी बोंडअळीच्या प्राथमिक स्तरावरील नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा कडुलिंबावर आधारित कीडनाशक ५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारावे.
६) गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास प्रोफेनोफॉस (५० ईसी) ३० मिली किंवा एमामेक्टिन बोंझोएट (५ एसजी) ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
७) पांढरी माशी, फुलकिडे आणि तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी ८ ते १० याप्रमाणे लावावेत. एकरी २ फेरोमन सापळे लावावेत
(शिफारस केलेली औषधी/रासायनिक खते/किटकनाशके/तणनाशके दिलेल्या मात्रेत व दिलेल्या वेळी तज्ञांच्या सल्ल्यानुसारच अचूकपणे वापरावीत)