नगर : गतवर्षीपेक्षा यंदा चिंचेचे उत्पादन चांगले निघाले असून, नगर येथील बाजार समितीत दर दिवसाला सध्या साधारणपणे दीड हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. यंदा दर आणि आवक सध्या स्थिर असून, गेल्या आठवड्यात चिंचेला ६५०० ते १५ हजार व सरासरी १०,७५० रुपये प्रतिक्विटंल दर मिळाला होता. गेल्या वर्षी चिंचेला साधारणपणे २१ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता.
गतवर्षी जुलै ते सप्टेंबरपर्यंत पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने, चिंचेला चांगला फुलोरा आला. जून ते जुलै महिन्यातच चिंचेला फुलोरा येतो. त्यानंतर चिंचा लागून मार्चपर्यंत त्याची वाढ होते. दरम्यान, परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने, चिंचेच्या वाढीच्या काळातच पाऊस झाला. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा झाडाला चिंचा मोठ्या प्रमाणात लागल्या होत्या, यंदाच्या हंगामात बांधावरच चिंचांना ९० ते १०० रुपये प्रतिकिलो असा दर मिळतोय. तर बाजार समितीत सरासरी दहा हजाराच्या वर प्रतिक्विंटलने चिंच विकली जात आहे. त्यामुळे चवीने आंबट असलेली चिंच उत्पादनांना मात्र गोड वाटत आहे.
नगरसह शेजारच्या बीड, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव व पुणे जिल्ह्यांतील काही भागांत चिंचेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. बांधावरील पीक म्हणूनही चिंचेकडे पाहिले जात असले तरी, उन्हाळ्यात चिंचेतून अनेक महिलांना रोजगारही मिळतो. नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत या भागातून चिंचेची आवक होते. यंदा गतवर्षीच्या चिंचेचे चांगले उत्पादन निघाल्याचे बोललो जात आहे. सध्या येथील बाजार समितीत फोडलेल्या चिंचेची साधारणपणे दीड हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. फोडलेल्या चिंचेला प्रतिक्विंटल ६५०० ते १५ हजार व सरासरी १०,७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
शिवाय बोटूक चिंचेला २९०० ते ३२६० रुपये व सरासरी ३०८० रुपये दर मिळत असून, बोटूक चिंचेची ३०० ते ४०० क्विटंलपर्यंत आवक होत आहे. चिंचोक्याचीही २५० ते ३०० क्विंटलची आवक होत असून, १४५० ते १५०० रुपये व सरासरी पावणेपंधराशे रुपयांचा दर मिळत आहे. नगर येथील देशभरासह परदेशातही चिंचेची निर्यात होत असून, गेल्या वर्षी चिंचेला २१ हजार रुपयांपर्यंत जास्तीत दर मिळाला होता. यंदाच्या हंगामात राज्यातील चिंचेचे उत्पादन सुमारे २० टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यात मुळात चिंचेची लागवड बांधावर मोठ्या प्रमाणात होत असली तरी, हे पीक केवळ पावसावर अवलंबून असते. यंदा परतीचा पाऊस चांगला झाल्याने पीक अधिक बहरले आहे.