नागपूर : विदर्भावर पावसाची कधी नव्हे ती अधिकची कृपादृष्टी राहिलेली आहे. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. कुठे मुसळधार तर कुठे ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांसाठी हा पाऊस फायद्यापेक्षा नुकसानीचा जास्त ठरला आहे. सलग १५ ते २० दिवस झालेल्या पावसामुळे खरिपातील पिके तर वाहून गेलीच आहेत पण शेत जमिनीही खरडून गेल्याचे चित्र विदर्भातील अनेक गावांमध्ये आहे. पंचानाम्यांना सुरुवात झाली असली तरी पाण्यात सडत असलेली पिकं वाचवायची कशी? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
विदर्भात दरवर्षी कमी पावसामुळे धान पिकाची लागवड होत नाही. पण यंदा चित्र बदलले आहे. हंगामाच्या सुरवातीलाच पावसाने असे काय थैमान घातले आहे. जुलैच्या पहिल्या दिवसापासून राज्यात पावसाने हाहाकार घातला आहे. त्यामुळे लागवड झालेल्या क्षेत्रातील पिकांवर पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे वाढ तर खुंटलीच आहे पण सततच्या पावसामुळे पाण्याचा निचराही होत नाही. हंगामाच्या सुरवातीलाच सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने उत्पादन घटण्याचा धोका कायम आहे.
नुकसान झालेल्या क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकर्यांच्या बांधावर पोहचत आहेत. आतापर्यंतच्या पाहणीतून धान पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आता प्रत्यक्ष पंचनाम्याला सुरवात झाली असून आर्थिक मदत मिळे असा आशावाद शेतकर्यांना आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल २०८ हेक्टर क्षेत्रफळावरील पीकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा जास्त शेतकर्यांचे नुकसान झालेले दिसत आहे. अन्य जिल्ह्यांमध्येही फारशी परिस्थिती वेगळी नाही. यामुळे शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करुन शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा आहे.