मुंबई : भारतात उत्पादित शेतमाल, फळे, फुलं यांना परदेशात मोठी मागणी असते. अनेक शेतकरी दर्जेदार मालाचे उत्पादन करतात मात्र त्यांना परदेशात विक्री कशी कारायची? याबाबत माहिती नसते. ज्यांना याबाबतची माहिती असते त्यांच्याकडे शेतमाल निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध नसतात. शेतकर्यांची ही अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडाळातर्फे निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. या निर्यात केंद्राची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
अमेरिकेसह युरोपिय देशांमध्ये निर्यात करण्यासाठी त्या देशांचे आयात धोरण काय आहे? याची माहिती असणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, परदेशी बाजारपेठेमध्ये पाठविल्या जाणार्या फळांची प्रत चांगली असणे, फळांवर डाग नसणे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. यासह त्याचे पॅकेजिंगसुध्दा दर्जेदार असणे आवश्यक असते. ताजी फळे, भाजीपाला व फुले यांच्या निर्यातीकरिता त्यांची योग्य हाताळणी, प्रतवारी व साठवणूक इ. सुगीपश्चात तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच ग्रेडिंग, पॅकिंग, प्रिकुलिंग व शीतगृह या सारख्या सुविधा उत्पादन क्षेत्रामध्ये उपलब्ध करणे आवश्यक आहे. तसेच नाशवंत शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उत्पादनाच्या ठिकाणी शीतगृहांची उभारणी गरजेची आहे.
महाराष्ट्रातील बराच भाजीपाला, फळे व फुले हे खेड्यांमध्ये अथवा तालुक्याच्या ठिकाणी उत्पादित होत असतो. परंतु सदर मालाची साठवणूक करणेसाठी त्या ठिकाणी शीतगृहांची व्यवस्था नसल्याचे दिसते. शेतकर्यांनी ही अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने राज्याच्या विविध भागांमध्ये तेथील भौगोलिक स्थिती तसेच फ ळे, भाजीपाला व फुले यांच्या उत्पादनास असणारे पोषक हवामान या बाबींचा विचार करून निर्यात सुविधा केंद्र, फळे व भाजीपाला आधुनिक निर्यात सुविधा केंद्र व फुले निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी केलेली आहे. या सुविधा केंद्रांची उभारणी करताना यामध्ये प्रामुख्याने प्रशितकरण, शीतगृह, रायपनिंग चेंबर, हाताळणी यंत्रणा, प्रतवारी व पॅकिंग यांची अद्यावयात यंत्रसामुग्रीची उभारणी केलेली आहे.
या सुविधा केंद्रांवर कोल्डरूम, प्रशितकरण, रायपनिंग चेंबर, हाताळणी यंत्रणा, प्लॅस्टिक क्रेटस या सुविधा पुरविलेल्या आहेत. तसेच सदर सुविधा केंद्रावरील विद्युत पुरवठा हा कृषि दराप्रमाणे घेण्यात आलेला आहे. ज्या सुविधा केंद्रावर विद्युत पुरवठा अनियमित आहे अशा सुविधा केंद्रावर एक्स्प्रेस फीडरवरून विद्युत पुरवठा घेण्यात आलेला आहे. शेतकर्यांनी कृषी पणन मंडळाचे सुविधा केंद्रांचा जास्तीतजास्त वापर करून राज्यातील शेतमाल निर्यातीस चालना द्यावी. याचे अधिक माहितीसाठी कृषि पणन मंडळाचे मुख्यालय व विभागीय कार्यालये येथे संपर्क करावा.