बुलढाणा : कांद्याच्या भावातील चढ उतार अत्यंत बेभरवश्याचे असतात. गेल्या महिन्यात तीस ते चाळीस रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा चक्क २ ते ३ रुपये किलो दरावे विकण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकर्यांना झालेला खर्च देखील सुटत नाही. त्या उलट जास्तीचे नुकसान सहन करावे लागत आहे. असाचा प्रसंग शेगावच्या गणेशराव पिंगळे या शेतकर्याच्या नशिबात आला.
शेगाव येथील गणेशराव पिंपळे यांनी २ एकरामध्ये कांदा लागवड केली होती. सर्वकाही सुरळीत असताना ऐन विक्रीच्या दरम्यान कांद्याचे असे काय दर घसरले की, बाजारपेठेपर्यंतची वाहतूकीचा खर्च निघत नव्हता. बाजारपेठेत कांद्याला भाव नाही आणि घरात, शेतामध्ये तर कांदा सडणारच, अशा दुहेरी संकटात अडकलेल्या गणेशरावांनी बाजारात विक्रीसाठी आणलेला कांदा परत घरी न नेता त्याच ठिकाणी फुकट वाटून देण्याचा निर्णय घेतला.
गणेशरावांनी कांदा फुकट घेवून जाण्याचे आवाहन केल्यानंतर अनेकजण कांद्याच्या ढिगार्यावर तुटून पडले. ज्याला जमेत तितका कांदा लोकांनी घरी नेला. यामुळे अवघ्या काही मिनिटात कांद्याचे ढिगारे गायब झाले. गणेशरावांची ही कृती एकाप्रकारे शासनाच्या भुमिकेचा निषधार्थ केलेले आंदोलनच होते. विशेष म्हणजे त्यांनी कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या कामासाठी गणेश पिंपळे यांनी कर्ज काढले होते. कांदा विकून कर्ज फेडू अशी त्यांची स्वप्ने होती मात्र आता त्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा अजूनच वाढला आहे.
दोन महिन्यात १० पटीने घसरले कांद्याचे दर
उन्हाळी कांद्याला सुरवात होताच दरात झालेली घट अद्यापही कायम आहे. शेतकर्यांच्या कांद्याला ३ ते ४ रुपये किलो असा दर मिळत आहे. हंगामाच्या सुरवातीला हाच कांदा ३० ते ४० रुपये किलोने विकला गेला आहे. ठोक बाजारात दर नसले तरी किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून व्यापारी अधिकचा नफा कमावत आहे. शेतकर्यांना मात्र कवडीमोल दरातच विक्री करावी लागत आहे.
कांदा दरात वाढ झाली तर ग्राहकांना तो कांदा खरेदी करता यावा म्हणून नाफेड कांदा विक्री करतो. मात्र, आता शेतकर्यांना कमी दर मिळत असताना नाफेडने अधिकच्या किंमतीमध्ये कांदा खरेदी करणे क्रमप्राप्त असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. कांद्याचे दर घटताच किमान लागवड खर्च आणि केलेले परिश्रम याचे चीज होण्यासाठी सरकारने कांदा उत्पादकांना अनुदान रुपी मदत करणे गरजेचे आहे.