लातूर : गत हंगामात सोयाबीनला विक्रमी भाव मिळाल्यानंतर यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात विक्रमी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे मात्र त्याचवेळी बाजारपेठेत सोयाबीनचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्याच्या अगदी उलट परिस्थिी तुरी बाबत दिसून येत आहे. हंगामाच्या सुरवातीपासून तुरीला कधी ६ हजार ३०० पेक्षा अधिकचा दर नव्हता पण आता तुरीच्या दरात वाढ होऊन तूर ६ हजार ७०० रुपये क्विंटलवर स्थिरावली आहे.
सोयाबीनच्या दरात कशामुळे घसरण?
सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना देखील दरात सुधारणा नाहीतर उलट दर घसरु लागले आहेत. केंद्राने खाद्यतेलावरील आयात सेवा शुल्कात घट केली आहे. खाद्यतेलाचे दर नियंत्रणात यावे म्हणून केंद्राने हा निर्णय घेतला होता. शिवाय आता दरही घटले आहेत. असे असताना दुसरीकडे आयात शुल्क सेवा ही कमीच ठेवण्यात आली आहे. त्याचा परिणाम सोयाबीनवर होत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात ५०० रुपयांची घसरण झाली आहे. यंदा उशिरा खरिपातील पेरण्या झाल्याने शेतकर्यांनी उडीद, मुगाला डावलून सोयाबीनवर भर दिला आहे. असे असताना दर झपाट्याने घटत असतील सोयाबीनला भविष्य काय राहणार असा सवाल उपस्थित होत आहे.
सोयाबीनपेक्षा तुरीला अधिकचा दर
गतवर्षीच्या खरिपातील तूर आणि सोयाबीनची सध्या बाजारपेठेत आवक होत आहे. असे असले तरी तुरीच्या दरात मात्र मोठी वाढ झाली आहे. ६ हजार रुपये क्विंटलवर असलेले दर आता ६ हजार ७०० वर येऊन ठेपले आहेत. तर नाफेडने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावर तुरीला ६ हजार ३०० असा दर होता. खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर तुरीच्या दरात घसरण होईल असा अंदाज होता पण उलट तुरीच्या दरात वाढ होत आहे. सोयाबीनपेक्षा तुरीला अधिकचा दर मिळत आहे.
शेतकर्यांना खरिपासाठी पैशाची गरज
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन, तूर आणि हरभर्याची आवक होत आहे. शेतकर्यांना खरिपासाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी साठवलेला माल विक्री करीत आहे. सध्या मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला प्रति क्विंटल ६ हजार १०० रुपये असा सरासरी दर आहे. तर तुरीच्या दरात वाढ झाली असून ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल दर आहे. हरभरा खरेदी केंद्र बंद झाल्याने त्यालाही उठाव राहिलेला नाही. खुल्या बाजारपेठेत हरभर्याला ४ हजार ५०० असा दर आहे. तर खरेदी केंद्रावर ५ हजार २३० रुपये दर होता.