जळगाव : देशांतर्गत बाजारात मक्याचे दर वाढत असल्याचे दिसून येतेय. गेल्या आठवड्यात २२०० रुपयांपर्यंत असलेला मक्याचे दर आता तब्बल २४०० रुपयांवर पाेहाेचले आहेत. रब्बीतील मका बाजारात येईपर्यंत हे दर नवा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.
गेल्या खरिपात हमीभावाचा टप्पाही गाठू न शकलेल्या मक्याची मागणी आता युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात वाढली आहे. गेल्या चार वर्षांत नैसर्गिक आपत्तीचा बळी ठरलेल्या मक्यावर अलीकडे खरीप हंगामात लष्करी अळीचा प्रादुर्भाव हाेता. त्यामुळेच उत्पादनदेखील घटले आहे. या वर्षात मक्याला प्रतिक्विंटल ९५० पासून तर १७०० रुपयांपर्यंत भाव हाेता. मात्र अलीकडे मक्याचे दर वाढले आहेत. गेल्याच आठवड्यात २२०० रुपयांपर्यंत असलेला मका २४०० रुपयांवर गेला आहे. रब्बी हंगामात माेठ्या प्रमाणावर मक्याची लागवड झालेली असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा हाेण्याची शक्यता आहे. मे मध्ये मक्याचे दर आणखी वाढू शकतात.
साेयाबीनचे दर वाढेनात, उत्पादकांच्या चिंतेत भर
जगभरात साेयाबीनची मागणी असून, त्या प्रमाणात पुरवठा नाही. साेयाबीन तेल आणि साेयापेंडची टंचाई असली तरी साेयाबीनचे दर मात्र स्थिर आहेत. खरिपात साेयाबीनचे झालेले संपूर्ण उत्पादन बाजारात आलेले नाही. शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे भाववाढीच्या प्रतीक्षेत साेयाबीनचे साठे आहेत. मे मध्ये साेयाबीनचे दर वाढण्याची शक्यता गृहीत धरून साेयाबीनची साठेबाजी वाढली आहे. गेल्या वर्षी मे आणि जूनमध्ये साेयाबीनचे दर तब्बल १० हजार रूपयांच्या टप्प्यात गेले हाेते. त्या पार्श्वभूमीवर साेयाबीनची साठेबाजी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून सध्या दर स्थिर आहेत.