मुंबई : बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि बायो -मासपासून ग्रीन हायड्रोजनच्या (हरित इंधनाच्या) निर्मितीसाठी जैव-तंत्रज्ञानाच्या वापरावर संशोधन आवश्यक आहे. कारण भविष्यात ग्रीन हायड्रोजनचा (हरित इंधनाचा) वापर रसायने, खते, पोलाद सारख्या विविध उद्योगांमध्ये तसेच वाहतूक क्षेत्रातही होणार आहे. त्यामुळे देशातील तरुण, प्रतिभावान अभियांत्रिकी मनुष्यबळाला इलेक्ट्रोलायझिंगद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ग्रीन हायड्रोजन निर्मितीवर संशोधन करण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. यामुळे नगरपालिकांना कचर्यातून संपत्ती निर्मिती बरोबरच स्वच्छ भारत अभियान राबविण्यास देखील मदत होईल असेही गडकरी यांनी नमूद केले.
आयआयटी, मुंबई येथील शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटद्वारा आयोजित अलंकार-२०२२ या जागतिक नेतृत्व शिखर परिषदेत ते शनिवारी बोलत होते. देशात १२४ जिल्हे आहेत मात्र जिथे जास्त लोकसंख्या आहे तेथील लोक सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या आजही मागासलेले आहेत. यामुळे या जिल्ह्यांमधील वन-आधारित उद्योग, कृषी आणि ग्रामीण तंत्रज्ञान, आदिवासी क्षेत्र यांना संशोधकानी आपल्या संशोधनात प्राधान्य द्यायला हवे असे आवाहन गडकरी यांनी केले.