वाशिम : पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या रखडल्या असल्यातरी शेतकर्यांना सुरुवातीपासून खत टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र कृत्रिम खत टंचाईमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. याविरोधात वाशिममध्ये मनसेने मात्र आपल्या स्टाईलने आंदोलन केले आहे. थेट जिल्हाधिकार्यांना शेणखताची बॅग देऊन रासायनिक खताचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आंदोलना दरम्यान केली आहे.
कृषी विभागाने खत आणि बियाणांचा मागणी तेवढा पुरवठा केला असल्याचे स्पष्ट केले होते मात्र, स्थानिक पातळीवर चित्र हे वेगळेच आहे. खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन किंवा लिंकिग पध्दतीने खत विक्री करुन शेतकर्यांची लूट केली जात आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत असचतानाच आता कृषी केंद्रातूनही लूट केली जात असल्याने मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मनसे पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे वाजवले तर शेणखताची बॅग देऊन रासायनिक खताचा सुरळीत पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील खरीप क्षेत्राप्रमाणे रासायनिक खताचा पुरवठा झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. असे असताना तुटवडा भासतोच कसा असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. याबाबत शेतकरी अनभिज्ञ असल्याचा फायदा कृषी केंद्र चालक घेत आहेत. कृषी विभागाने नेमलेल्या भरारी पथकाचा वचक या कृषी सेवा केंद्रावर राहिलेला नाही. त्यामुळे अनोख्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले होते. आता या आंदोलनानंतर तरी कृषी विभाग शेतकर्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिला का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!