पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकर्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. दरम्यान, हातातोंडाला आलेलं पीक जाईल या भीतीखाली अनेक शेतकरी आहेत. महाराष्ट्रातील पीक काढणीला आली असल्यानं शेतकर्यांना अवकाळी पाऊसामुळं मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानं अवकाळी पावसाचा इशारा देत औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि अकोला या ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला होता. यानुसार महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारीही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी पाऊसही झाला.
खान्देशात ज्वारी, हरबरा आणि गहूचे नुकसान
जळगाव जिल्ह्यात धरणगाव, पाचोरा, भुसावळ तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गहू, हरभरा, दादर, बाजरी पिकाचे नुकसान होईल. ज्वारी, हरबरा आणि गहू काढणीच्या तोंडावर अवकाळी पाऊस झाल्यानं शेतकर्यांन पुढे पुन्हा एकदा संकट निर्माण झालंय. दरम्यान, गहू, हरबरा आणि दादर पिकाचं नुकसान होण्याचा अंदाज आता वर्तविला जातोय.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पूर्व भागात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह गारपीट झाली. वादळी वार्यामुळे केळीचे रोप व काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान झाले. तालुक्यातील पूर्व भागातील जयनगर, कोंढावळ, वडाळी, बामखेडा, खैरवे हिंगणी, फेस, तोरखेडा आदी भागात गारपीट झाली. पपई व तोडणीला आलेल्या उसाचे क्षेत्रही ओले झाल्याने तोड थांबण्याची भीतीही आहे.
हे देखील वाचा :