Weather Alert 28 June 2022 : लांबलेल्या पावसाचे राज्यभरात आगमन झाले आहे. मात्र अजूनही सर्वत्र जोरदार पाऊस झालेला नाही. राज्यात २२ ते २७ जूनदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण राज्यात मोजक्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर उर्वरित ठिकाणी हलका पाऊस झाला. मात्र, पुढच्या दहा दिवसांत पुन्हा २७ जून ते ६ जुलै या १० दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अरबी समुद्रात दक्षिणोत्तर दिशास्थित तटीय कमी दाब द्रोणीय क्षेत्र तसेच बळकट, आर्द्रतायुक्त समुद्रीय पश्चिमी वार्यांच्या प्रभावामुळे पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण, गोवा व विदर्भात २९ जूनपासून अति जोरदार पावसाची शकक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, लातूर, बीड या जिल्ह्यांत मंगळवार व बुधवार असे फक्त दोन दिवस पावसाचा प्रभाव कमी राहणार आहे. त्यानंतर पावसाचा जोर पहायला मिळेल, असा अंदाज आहे.
सोमवारी उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पावसाने सुमारे एक तासांची जोरदार सलामी दिल्याने शेतकरी सुखावला आहे. यामुळे रखडलेल्या पेरण्यांनाही वेग आला आहे.चनगर शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात नगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नेवासे, राहुरी, संगमनेर, अकोले व श्रीरामपूर या तालुक्यांत आतापर्यंत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मराठवाड्यातही जालना, नांदेड जिल्ह्यात पावसाची हजेरी लावली. आता पुन्हा २७ जून ते ६ जुलै या १० दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.