Weather Alert | मुंबई: येत्या ४८ तासांत मुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. आज (ता. ३०) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम आहे. रायगड, मुंबई, ठाण्यासह, विदर्भातील बुलडाणा, अकोला, वशीम, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यात पावसाने ओढ दिली असल्यामुळे ग्रामीण भागात पेरण्यांना उशीर झालाय. या पेरण्या जुलै महिन्यापासून सुरू कराव्यात असे आवाहन आधीच करण्यात आलंय. राज्यात अनेक भागात काल सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अधूनमधून मध्यम आणि जोरदार सरी कोसळल्या. आज गुरुवारी मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
नैर्ऋत्य मोसमी वार्यांनी (मॉन्सून) उत्तर भारतात प्रगती केली आहे. बुधवारी (ता. २९) संपूर्ण, बिहार, उत्तराखंडसह, हिमाचल प्रदेशचा बहुतांशी भाग, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उद्यापर्यंत (ता. १) संपूर्ण अरबी समुद्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्लीसह, राजस्थान, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाना, चंडीगडच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ऑरेंज अलर्ट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
यलो अलर्ट :
कोकण : रायगड, ठाणे, मुंबई.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली.
विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.