परभणी : अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांवर विपरित परिणाम होत आहे. अतिपावसामुळे पिकं पिवळी पडायला लागली असतांना गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामाला वेग आला आहे. मशागतीच्या कामांबरोबर पिकांना खत आणि फवारणीची कामे जोमात सुरु आहेत. पावसाने उघडीप दिली तरी ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किड-रोगराईचा प्रादुर्भाव हा कायम आहे. सोयाबीन, कापूस आणि मुगावार रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे.
अशा संकटकाळात शेतकर्यांना योग्य व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. पिकांना वाचविण्यासाठी कीड व्यस्थापन हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. पिकांना कीड रोगांपासून वाचविण्यासाठी विविध रासायनिक खतांचा डोस दिला जात आहे. मात्र हे करत असतांना शेतकर्यांनी योग्य कीड नियंत्रक व योग्य वेळ साधने गरजेचे आहे. अन्यथा शेतकर्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसू शकतो. पावसाने जशी आता उघडीप दिली आहे तसेच वातावरण अजून काही दिवस कायम राहिले तर पिके बहरतील आणि उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे.
खरीप हंगामात राज्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा झाला आहे तर त्यापाठोपाठ कापसाने क्षत्र व्यापले आहे. मात्र, पेरणी होताच पावसाने अशी काय हजेरी लावली की, पिकांची वाढ तर सोडाच पण पेरलेलं उगवणार की नाही याची शंका उपस्थित झाली होती. हंगामाच्या सुरवातीपासूनच खरीप पिके संकटात होती. उत्पादनात घट तर होणारच पण शेतकर्यांनी केलेला खर्चही व्यर्थ अशी स्थिती राज्यात निर्माण झाली होती. त्यामुळे सध्या पावसाने उघडीप दिली तरी त्याचा उत्पादन वाढीवर कितपत परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.