पुणे : सध्याच्या हंगामात गव्हाला २०१५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळतो. मात्र पंजाबमधील ‘सोने-मोती’ या वाणाला खरोखरच यंदा सोन्याचे दर मिळत आहे. पंजाबमध्ये सोने-मोती वाणाच्या गव्हाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या खुल्या बाजारपेठेत ८ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. आरोग्याच्या दृष्टीने जागृत असलेले नागरिक हे या वाणाच्या गहू खरेदीला अधिक पसंती देत आहेत. एवढेच नाही तर पेरणी दरम्यानच गहूचे बुकींग केले जाते.
सोने – मोती हे पंजाबमध्ये पिकवले जाणारे गव्हाचे जुने वाण आहे. यंदा ज्या शेतकर्यांनी यावेळी सोने आणि मोत्याच्या गव्हाचे उत्पादन घेतले आहे, त्यांना इतर वाणांपेक्षा या जातीच्या गव्हाच्या चारपट अधिक भाव मिळत आहे. या वाणाच्या गव्हामध्ये ग्लूटेनचे प्रमाण खूप कमी असते. तसेच गव्हाच्या या जातीमध्ये ग्लाइसेमिकचे प्रमाण आणि फॉलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. एकूणच गव्हाची ही प्राचीन जात उच्च व पौष्टिक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. यामुळे या वाणाला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.
गव्हाची सोन्या-मोतीचे वाण हे हजारो वर्षे जुनी असल्याचे मानले जाते, जे आता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्येही लोकप्रिय होत आहे. सोने-मोती वाणाचे उत्पादन एकरी सुमारे ८ क्विंटल आहे. गव्हाच्या इतर लोकप्रिय वाणांमध्ये एकरी २०-२१ क्विंटल उत्पादन मिळते, परंतु सोने-मोती वाणापासून मिळणारे उत्पन्न निश्चितपणे जास्त असते.