पुणे : अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना रेशन दुकानांवर फळे आणि भाजीपाला विकण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अर्थात त्यासाठी काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आली होती. त्यानंतर आता ही योजना मुंबई आणि ठाण्यात देखील राबवण्यात येणार आहे.
रेशन दुकानावर फळे आणि भाजीपाला विक्रीचा उपक्रम पुणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला होता. आता त्यानंतर असाच उपक्रम मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या वतीने यासाठी दोन शेतकरी उत्पादक कंपन्या शास्वत कृषी विकास इंडिया आणि फार्म फिस्ट फार्मर्स प्रोड्यूसर यांना परवानगी देण्यात आली आहे. फळे आणि भाजीपाल्याचे कुठले उत्पादन विकावे याचे कंपनीवर बंधन नसल्याचे शासन निर्णयामध्ये म्हटले आहे.
रेशन दुकानात फळे आणि भाजीपाला विकण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर लवकरच रेशन दुकानात किराणा मालाची देखील विक्री करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारच्या या नव्या उपक्रमामुळे ग्राहकांना सर्वच गोष्टी एका छताखाली मिळण्यास मदत होणार आहे. पुणे, मुंबई आणि ठाण्यानंतर भाजीपाला विक्रीचा प्रयोग इतर शहरात देखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.