नाशिक : ग्रामीण भागातील तरुण नोकरीच्या शोधात शहरात येतात. शेती परवडत नाही म्हणून अनेक तरुण शेतकरी नोकरीचा मार्ग धरतात. देशातील बहुतेक तरुणांना गावात पैसे कमवण्याची कोणतीही सुविधा मिळत नसल्यामुळे नोकरी शोधण्याची इच्छा नसतानाही गाव सोडून शहरात यावे लागते. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला येथे अशा तीन व्यवसाय कल्पना देणार आहोत, ज्यामुळे गावात देखील एक फायदेशीर व्यवहार सुरू होईल.
१) कृषी वस्तू आणि पशुखाद्य
गावातील बहुतेक लोक एकतर शेती करतात किंवा त्यांच्या घरी गायी आणि म्हशी पाळतात. त्या दृष्टीने गावात प्राण्यांच्या खाद्यपदार्थांचा व्यवसाय केल्यास तोही फायदेशीर व्यवसाय ठरु शकतो. याकरीता जनावरांना पौष्टिक खाद्य कसे उपलब्ध होईल, याबाबत जनजागृती करुन त्याचा व्यवसाय सुरु करता येवू शकतो. खेडेगावातील जवळपास प्रत्येक घरात दररोज पशुखाद्य उत्पादने आणि खते वापरली जातात. अशा परिस्थितीत गावातील व्यवसायासाठी कृषी साहित्य आणि पशुखाद्य उत्पादने हा उत्तम पर्याय आहे.
२) शेणखत किंवा सेंद्रीय खत
याशिवाय जोडीला जनावरांपासून शेणखत निर्मिती करता येते. आता सेंद्रिय शेतीचे महत्त्व अनेकांना पटले आहे. यामुळे सेंद्रिय खतांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरातील अनेक मोठ्या कंपन्या शेणखत किंवा अन्य सेंद्रिय खतांच्या शोधात पशूपालकांशी संपर्क साधत आहे.
३) इलेक्ट्रॉनिक असेसरीज स्टोअर्स
आता जवळपास प्रत्येक गावात टीव्ही, लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल आणि तंत्रज्ञान आणि दळणवळणाशी निगडित अनेक गोष्टी पोहोचल्या आहेत, पण आजही खेड्यापाड्यांसमोर सर्वात मोठी समस्या ही आहे की, या इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या तर त्या दुरुस्त करण्यासाठी शहरात आणाव्या लागतात. अशा परिस्थितीत गावात इलेक्ट्रॉनिक असेसरीज स्टोअर्स सुरू करण्याचा व्यवसायही मोठे यश देऊ शकतो.