नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधीचा १२ वा हप्ता लवकरच शेतकर्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाणार आहे. मात्र याआधी शेतकर्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळू शकते. रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवण्यास सरकारकडून लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ आणि सीसीईएच्या बैठकीत रब्बी पिकांच्या एमएसपीवर निर्णय अपेक्षित आहे.
सरकार रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये ९ टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. डाळींच्या किमतीत सर्वाधिक बदल होऊ शकतात. दरम्यान, ऑगस्टमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने किंमत समर्थन योजना अंतर्गत तूर, उडीद आणि मसूर डाळ खरेदीची मर्यादा ४० टक्क्यांपर्यंत वाढवली होती. यापूर्वी ही मर्यादा २५ टक्के होती.
पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी देशातील जवळपास १० कोटी शेतकर्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केला जाण्याची शक्यता आहे. १७ ऑक्टोबर रोजी पुसा येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शेतकर्यांच्या खात्यात हप्ता ट्रान्सफर केला जाईल. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी-स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि किसान संमेलन २०२२ दरम्यान काही शेतकर्यांनाही भेटतील.