पुणे : दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी आणि पशुपालनाच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारतर्फे दुग्धउद्योजक विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत १० म्हशींचे दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी पशुधन विभागाकडून ७ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. याशिवाय शासनाकडून योजनेवर अनुदानही दिले जाते. नेमकी ही योजना काय आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
डेअरी उद्योजक विकास योजना या योजनेंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उघडण्यासाठी शासनाकडून अनुदानाचा लाभ दिला जातो. तुमच्याकडे डेअरी उघडण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन तुमचा रोजगार सुरू करू शकता. या योजनेअंतर्गत बँकेकडून ७ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्हाला व्यापारी बँका, प्रादेशिक बँका, राज्य सहकारी बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका आणि नाबार्डकडून अनुदानास पात्र असलेल्या इतर संस्थांशी संपर्क साधावा लागेल. जर कर्जाची रक्कम एक लाखापेक्षा जास्त असेल तर कर्जदाराला त्याच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे गहाण ठेवावी लागतील.
डेअरी उद्योजक विकास योजनेंतर्गत सर्वसाधारण श्रेणीतील दुग्धशाळा चालकांना २५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर महिला आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ३३ टक्के अनुदान दिले जाईल. या योजनेमध्ये तुम्हाला फक्त १० टक्के पैसे स्वतः गुंतवावे लागतील आणि उर्वरित ९० टक्के रक्कम बँक कर्ज आणि सरकारकडून सबसिडी दिली जाईल.
कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :
१) आधारकार्ड
२) पॅनकार्ड
३) मागास जातीच्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र
४) अर्जदाराच्या खात्याचा रद्द केलेला चेक
५) कोणत्याही बँकेचे कर्ज थकीत नसल्याचे प्रमाणपत्र