नांदेड : मागील काही दिवसापासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी या पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.
शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट
नांदेड जिल्ह्यात काल मध्यरात्री चालू झालेल्या मुसळधार पावसामुळं अक्षरशः हाहाकार घातला आहे. सायंकाळी सुरु झालेल्या या ढगफुटीसदृश्य पाऊसामुळं हजारो हेक्टरावरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. तर शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळं सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळं अगोदरच पाण्याअभावी दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा तिबार पेरणीचे संकट उभं राहिलं आहे.
दरम्यान, वसमत नांदेड राज्य महामार्गावरील आसना नदी पूल पाण्याखाली जाऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर हजारो हेक्टरवरील सोयाबीन, केळी, ऊस, उडीद, मूग, कापूस, हळद ही शेतकऱ्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान पुराच्या पाण्यामुळं पिकांसह शेतीही खरडून गेली आहे.
दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. रात्रीपासूनच जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा किन्होळा आसेगाव गावांच्या शिवारात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं गावांमध्ये पाणी शिरलं आहे. हे पाणी संपूर्ण गावातील घरात शिरल्यानं नागरिक भयभीत झाले आहेत. जीव वाचवण्यासाठी नागरिक घरातील छतावर जाऊन बसले आहेत.