पुणे : खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खरीप पीककर्जाची यावर्षी ९०.३३ टक्के कर्जफेड केली आहे. २४३ कोटी ७५ लाख रुपयांची कर्जफेड ही आजवरची उच्चांकी कर्जफेड असून. एकूण १०४ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांपैकी ३५ सोसायट्यांनी शंभर टक्के कर्ज वसुली केली आहे. अशी माहिती बँकेचे संचालक आमदार दिलीप मोहिते पाटील आणि बँकेचे विभागीय अधिकारी विलास भास्कर यांनी दिली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खेड तालुक्यात १८ शाखा आहेत. तालुक्यातील १०४ सोसायट्यांनी, गेल्या खरीप हंगामात २६९ कोटी ८३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले होते. त्यापैकी ३१ मार्च अखेर ६ टक्के व्याजासह शेतकऱ्यांनी २४३ कोटी ७५ लाख परत केले. वेळेत कर्जफेड केल्याने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराचा फायदा मिळणार आहे. यामध्ये ३५ सोसायट्यांची शंभर टक्के कर्जवसुली झाली, तर ६९ सोसायट्यांची ९० टक्के वसुली केली. गेल्या दोन वर्षांत अनेक नैसर्गिक संकटे येऊनही, शेतकऱ्यांनी मुदतीत कर्जाची परतफेड केल्याने, त्याबद्दल शेतकरी सभासद अभिनंदनास पात्र आहेत, अशा शब्दांत मोहिते यांनी त्यांचे कौतुक केले.
शंभर टक्के वसुली केलेल्या सोसायट्या
दोंदे, पिंपरी बुद्रुक, संतोषनगर, टाकळकरवाडी, शेलू, चिंबळी, वाडा, कोयाळी तर्फे वाडा, देवोशी, औदर, चिखलगाव, येणिये बुद्रुक, आळंदी देवाची, वडगाव घेनंद, जऊळके बुद्रुक, वरुडे, वाकळवाडी, गुळाणी, कन्हेरसर, निमगाव, चासकमान, कडधे, भोसे, शेलगाव, पवळेवाडी, बहुळ, मोहितेवाडी, औंढे, भलवडी, शिवे, रेटवडी, गोसासी, जरेवाडी, खराबवाडी.