नागपूर : संवर्धित शेती पद्धतीचा वापर करून जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी विकसित केलेले तंत्र म्हणजे शून्य मशागत तंत्र होय. शून्य मशागत तंत्र राज्यातील भात, सोयाबीन, कापूस, मका, सुर्यफुल, हरभरा, झेंडू इ. पिकांसाठी फायदेशीर आहे. सदर तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, गहू, इतर तृणधान्ये, तूर, मूग, उडीद, हरभरा, इतर कडधान्ये, भुईमूग, सुर्यफुल, मोहरी, जवस, तीळ, इतर तेलबिया, कांदा, भाजीपाला, फुलपिके, औषधी व सुगंधी पिकांची लागवड करणे शक्य आहे. हळद, आले, बटाटा, रताळे, गाजर अशा पिकांचा जमिनीखाली वाढणारा बहुतांशी भाग काढण्यासाठी जमिनीची मोठी खांदणी करावी लागत असल्याने या पिकांमध्ये शून्य मशागत तंत्र वापरण्यावर काही मर्यादा आहेत.
यासाठी आहे शून्य मशागत तंत्राची आवश्यकता
पेरणीपूर्वी शेत नांगरणे, ढेकळे फोडणे, दिड किंवा कुळवाच्या पाळ्या मारून माती बारीक करणे, सपाट करणे वखरणी, कोळपणी अशा प्रकारची मशागतीची कामे वर्षांनुवर्षे चालत आली आहेत. मात्र याची दुष्यपरिणाम आता समोर येवू लागले आहेत. अतिमशागतीमुळे जमिनीमध्ये दीड-दोन फुटाखाली कडकपणा येऊन जमिनीची नैसर्गिक रचना बिघडत चालली आहे. वारंवार जमीनीची मशागत केल्याने मातीची सारखी हलवाहलव होऊन खालच्या थरातील माती वर येते व या मातीवर सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आणि उष्णतेमुळे प्रतिकूल परिणाम होतो.
सर्वप्रथम तापलेल्या मातीतील सेंद्रिय कर्ब हवेत उडून जाण्याची प्रक्रिया सुरू होते आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. सेंद्रिय पदार्थ कमी झाल्याने मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव आणि गांडूळासारखे उपयुक्त प्राण्यांचे प्रमाण घटत जाते. पिकाच्या लागवड खर्चामध्ये मशागतीचा खर्च निम्म्याहून अधिक असून दिवसेदिवस मशागतीच्या खर्चामध्ये वाढ होत आहे, परिणामी लागवड खर्च देखील वाढत आहे.
शून्य मशागत तंत्रातील महत्त्वाचे टप्पे
जमिनीचा सेंद्रिय कर्ब तपासणे : ज्या जमिनीवर शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करावयाचा आहे त्या जमिनीतील मातीचे परीक्षण करून घ्यावे आणि सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणाची नोंद ठेवावी. शून्य मशागतीचा अवलंब केल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढत असून जमिनीची सुपीकता चांगली राहते व परिणामी उत्पादनामध्ये वाढ होते.
गादी वाफा तयार करणे : पहिल्या हंगामात फक्त गादी वाफे तयार करून घ्यावेत. यासाठी मजुरांमार्फत, बेड मेकरद्वारे किंवा बीबीएफद्वारे वाफे करावे. गादी वाफ्याचा आकार ४.५ फूट रुंदी व अर्धाफुट उंची असा असावा. पिकाच्या प्रकारानुसार आणि ओळींच्या संख्येनुसार वाफ्याच्या रुंदीमध्ये
आवड्यकतेनुसार थोडासा बदल करावा.
टोकण पद्धतीने लागवड करणे : गादी वाफ्यावर बियाण्याची टोकण करावी. त्यावेळी बियाणे व खते एकत्रपणे टोकावीत. बियाण्याची टोकण मजुरांमार्फत, टोकण यंत्रामार्फत किंवा टोकण साचा वापरून करावी.
तणनाशकाची फवारणी : पिकाचे लागवडीनंतर व उगवणीपुर्वी शिफारशीत तणनाशक फवारावे. उभ्या पिकात तणांचा प्रादुर्भाव वाढल्यास शिफारस केलेली निवडक तणनाडके वापरावीत. कोणत्याही परिस्थितीत तणे उपटून काढू नयेत. तसेच निंदणी, भांगलणी किंवा कोळपणी करू नये.
आंतरमशागतीची कामे करू नये : पीक वाढीच्या अवस्थेत कीड व रोगाचे व्यवस्थापन करावे तसेच आवश्यकतेनुसार सिंचन व्यवस्थापन करावे. तथापि कोळपणी, डवरणी, भर घालणे इ. आंतरमशागतीची कामे करण्याची गरज नाही.
कापणी करून पिकांची काढणी : काढणीच्यावेळी पिके कोणत्याही परिस्थितीत जमिनीतून उपटू नये, तर त्यांची कापणी करावी आणि धसकटे व मुळांचा भाग तसाच ठेवावा.
त्याच वाफ्यावर पुढील पिकाची लागवड : पहिल्या हंगामात वाफे न मोडता अगोदरचे पीक कापल्यानंतर तणनाहकाची फवारणी करून पुढील पिकाची टोकण करावी. गरज पडल्यास वाफ्यांची डागडुजी करावी.
जमिनीची मशागत न करणे : कोणत्याही परिस्थितीत नांगरणी, कुळवणी, कोळपणी अशा प्रकारची मशागतीची कामे करण्यात येऊ नयेत. या तंत्राने जमिनीमध्ये गांडूळांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने आणि जिवाणूंचे प्रमाण वाढल्याने जमिनी भूसभूशीत राहतात. मशागतीचा उद्देश गांडुळे पूर्ण करतात.
हे आहेत शून्य मशागतीचे फायदे
१) मातीच्या सुपीक थरांमध्ये फारशी उलथापालथ होत नाही. यामुळे सेंद्रिय पदार्थांची मातीमध्ये दीर्घकालीन साठवण होण्यास मदत होते.
२) सातत्याने सेंद्रिय कर्बाची उपलब्धता आणि ओलावा टिकून राहिल्याने मातीतील उपयुक्त जिवाणुंच्या संख्येत वाढ होते.
३) जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे रासायनिक खताची बचत होते.
४) जमिनीत जैविक विविधतेत वाढ होऊन मातीचे आरोग्य सक्षम होते.
५) मातीचे तापमान नियंत्रित राहते.
६) जमिनी भेगाळण्याचे प्रमाण कमी होते तसेच जमिनीची धूप कमी होते.
७) पिकावर रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
८) मशागतीसाठी लागणारे मनुष्यबळ यात बचत होते. तसेच मशागत खर्च शून्यावर येऊन उत्पादन खर्चामध्ये मोठी बचत होते.
९) उत्पादनाचा दर्जा सुधारतो आणि पौष्टिक अन्नधान्याची निर्मिती होते. पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते.