जळगाव : हंगापूर्वीच कपाशीचा पेरा केल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शास आल्यानंतर यंदा ३१ मे पर्यंत कपाशी बियाणे विक्रीला बंदी होती. आता कृषि विभागाच्या नव्या धोरणानुसार १ जूनपासून बियाणे खरेदी-विक्रीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याचवेळी राज्यभरात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने पेरणीलाही प्रारंभ झाला आहे.
खरीपपूर्व हंगामात लागवड केल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. गेल्या काही वर्षातील निरीक्षणातून ही बाब कृषी विभागाच्या निदर्शनास आल्याने कपाशी बियाणे विक्रीचे वेळापत्रकच ठरविण्यात आले होते.
ज्या ठिकाणी बियाणांची उत्पादकता होते तेथून वितरकांपर्यंत १ ते १० मे दरम्यान बियाणे पुरविण्यात आले. तर वितरकांकडून १५ मे पासून किरकोळ विक्रत्यांना पुरविण्यात आले. त्यानंतर किरकोळ विक्रत्यांकडून शेतकर्यांना १ जून नंतर विक्री सुरु झाली आहे.
दरम्यान गत २४ तासात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीही सुखावला आहे. दरम्यान बियाणे विक्रीच्या पहिल्याच दिवशी सर्व कृषी केंद्रांवर बियाणे खरेदीसाठी शेतकर्यांनी गर्दी केली होती. बियाणे खरेदी केल्यानंतर अनेकांनी थेट शेताची वाट धरली. यामुळे कपाशी लागवडीचाही अधिकृत प्रारंभ झाला आहे.