औरंगाबाद : गत हंगामात सोयाबीनला जास्त दर मिळल्यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीचा पेरा वाढला आहे. मात्र पेरणी झाल्यापासून होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शेतकर्यांनी या किडींचा वेळीच बंदोबस्त करण्याची आवाश्यकता आहे. सोयाबीनवर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. यात प्रामुख्याने खोड पोखरणार्या किडी, पाने खाणार्या अळ्या, रस शोषण करणार्या किडी आदींचा उल्लेख करता येईल, यांचे व्यवस्थापन कसे करावे? याबाबत तज्ञांनी काय सल्ला दिला आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
अ) खोड पोखरणार्या किडी :
१) खोडमाशी : खोड पोखरणार्या खोडमाशीची काळ्या रंगाची प्रौढ मादी माशी झाडाच्या देठावर व पानावर फिकट पिवळसर अंडी घालते. अंड्यातून दोन ते सात दिवसांत पांढर्या रंगाची पाय नसलेली अळी बाहेर पडून पानाच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत छिद्र करून आतील भाग पोखरून खाते. परिणामी झाडाला अन्नद्रव्ये न मिळाल्याने झाड वाळते. या किडीमुळे पिकाचे ३० ते ३५% पर्यंत नुकसान होऊ शकते.
उपाययोजना : सोयाबीन पिकाचे सूक्ष्म निरीक्षण करून प्रति मीटर ओळीत छिद्र असलेली कीडग्रस्त झाडे दोन ते तीनपेक्षा जास्त आढळल्यास ट्रायझोफॉस (४०%) २५ मिली किंवा फेनव्हरलेट (२० %) १० मिली किंवा क्विनॉलफॉस (२५%) २० मिली किंवा प्रोफेनोफॉस (५० ई. सी.) १५ मिली किंवा अॅसिफेट (७५%) १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच ज्या ठिकाणी दर वर्षी मोठ्या प्रमाणात खोडमाशीचा प्रादुर्भाव होत असेल, त्या ठिकाणी १० % दाणेदार फोरेट हेक्टरी १० किलो प्रमाणात पेरणीपूर्वी द्यावे.
२) चक्रीभुंगा : या किडीचा मादी भुंगा पानाच्या देठावर, फांदीवर किंवा खोडावर दोन चक्रकाप तयार करतो. त्यामध्ये मादी तीन छिद्रे करते आणि त्यापैकी एकात अंडी घालते. त्यामुळे चक्राच्या वरचा भाग वाळतो. अंड्यातून निघालेली अळी देठ, फांदी व खोड पोखरून पोकळ करत जाते. कीडग्रस्त झाड सुरुवातीला इतर झाडांसारखेच दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. चक्री भुंग्यामुळे शेंगा धरण्याच्या प्रमाणात, दाण्यांच्या संख्येत आणि वजनात अनुक्रमे ५३, ५६ आणि ६६ टक्केयांपर्यंत घट येऊ शकते.
उपाययोजना : सोयाबीन पिकात फुलोर्यापूर्वी ३-५ चक्री भुंगे प्रति मीटर ओळीत आढळल्यास ती आर्थिक नुकसानीची पातळी आहे. अशी स्थिती आल्यास ट्रायझोफॉस (४०%) २५ मिली किंवा फेनव्हरलेट (२०%) १० मिली किंवा प्रोफेनोफॉस (५० ई. सी.) १५ मिली किंवा अॅसिफेट (७५%) १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ब) पाने खाणार्या अळ्या :
१) हिरवी उंट अळी : या किडीची मादी पतंग सतत पाच दिवस दररोज ४० अंडी रात्रीच्या वेळी पानाच्या मागील पृष्ठभागावर घालते. दोन ते चार दिवसांत अंड्यातून निघालेली फिकट हिरव्या रंगाची ही अळी शरीराचा मधला भाग उंच करून चालते. उंट अळ्या प्रथम पानाचा हिरवा भाग खरडून खातात. त्यानंतर पानाचा सर्व भाग खाऊन फक्त शिराच शिल्लक ठेवतात. अळ्या फुलांचे व शेंगाचे प्रचंड नुकसान करतात.
उपाययोजना : पिकाचे सर्वेक्षण करून आर्थिक नुकसानीच्या पातळीस म्हणजेच चार लहान अळ्या प्रति मीटर ओळीत आढळल्यास क्लोरपायरीफास (२०%) २० मिली किंवा क्विनॉलफॉस (२५%) २० मिली किंवा इंडोक्सीकॉर्ब (१४.५%) १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्वरित फवारणी करावी.
२) केसाळ अळी : केसाळ अळीची मादी पतंग पानाच्या मागील बाजूस पुंजक्वरत समांतर ओळीत ४१२ ते १२४१ अंडी देऊ शकते. अळीची दोन्ही टोके काळी, तर मधला भाग मळकट पिवळा असतो आणि शरीरावर दाट नारिंगी केस असतात. या अळ्या पानाच्या मागील बाजूस राहून अधाशीपणे त्यातील हरितद्रव्ये खातात. त्यामुळे अशी पाने जाळीदार होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास खोडच शिल्लक राहते.
उपाययोजना : पिकाच्या सर्वेक्षणानंर ३-४ लहान अळ्या प्रति मीटर ओळीत आढळल्यास क्लोरपायसीफॉस(२५%) २० मिली किंवा अॅझाडिरेक्टिन (१५०० पीपीएम) २३५ मिली किंवा फेनव्हरलेट (२०%प्रवाही) ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) तंबाखूची पाने खाणारी अळी : या किडीला शास्त्रीय भाषेत स्पोडोप्टेरा लिटुरा या नावाने ओळखतात. बहुजातीय पिकाचे नुकसान करणार्या या किडीचा सोयाबीन पिकावर ऑगस्ट महिन्यात प्रादुर्भाव आढळतो. ही अळी मळकट पांढुरकी हिरवी व थोडीशी पारदर्शक असते. शरीरावर पिवळसर नारिंगी रेषा आणि काळे ठिपके असतात. या अळीची मादी पतंग पानावर पुंजक्यात ३०० ते ४०० अंडी घालते. तीन ते चार दिवसांत अंड्यातून निघालेल्या अळ्या सामूहिकपणे पानाचा हिरवा भाग खातात. त्यामुळे पाने जाळीदार दिसतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडाला पानेच शिल्लक राहत नाहीत.
उपाययोजना : पीक फुलावर येण्यापूर्वी ३-४ लहान अळ्या प्रति मिटर ओळीत आढळल्यास या किडीची आर्थिक नुकसानीची पातळी असते. क्विनॉलफॉस (२५%) २० मिली किंवा क्लोरपायरीफॉस (२०%) २० मिली किंवा थायोडिकार्ब (७५%) १५ ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस (५०%) २५ मिली किंवा स्पिनोसॅड (४५ एससी) ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
क) रस शोषण करणार्या किडी :
१) मावा : सोयाबीनवर आढळणारी मावा ही कीड अर्धगोलाकार, हिरव्या रंगाची असून मुख्यत: पानाखाली व खोडावर बसून रस शोषण करते. या किडीच्या अंगातून साखरेसारखा चिकट पदार्थ स्रवत असल्यामुळे पानावर काळी बुरशी वाढून पानातील प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते. तसेच यातील काही प्रजातींमुळे सोयाबीन मोझॅक व्हायरस या रोगाचा प्रसार होऊन पिकाचे अतोनात नुकसान होते.
२) तुडतुडे : हिरव्या रंगाचे, २.५ मिमी लांब पाचरीच्या आकाराचे तुडतुडे तिरपे चालणारे असतात. पिल्ले व प्रौढ तुडतुडे पानाच्या खालच्या बाजूने पानाच्या पेशीतील रस शोषण करतात आणि शरीरातील विषारी द्रव्य पानाच्या पेशीत सोडतात. त्यामुळे पानाच्या कडा पिवळ्या पडून वरील बाजूकडे वक्र होतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे २१.५ ते ३५.४ % उत्पादन घटू शकते.
३) पांढरी माशी : रस शोषण करणार्या गटातील ही एक महत्त्वाची कीड आहे. प्रौढ माशी एक ते दोन मिमी आकाराची फिकट हिरव्या रंगाची असून तिच्या पंखावर पांढरा मेणकट थर असतो. पांढर्या माशीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या मागील बाजूस राहून पानातून रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते. पाने पिवळी पडून गळतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास फुले व शेंगासुद्धा गळतात. रस शोषणाशिवाय पांढरी माशी आपल्या शरीरातून साखरेसारखा चिकट पदार्थ सोडते. त्यावर काळी बुरशी वाढून झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते. पांढरी माशी सोयाबीनच्या मोझॅक रोगाचा प्रसार करते.
उपाययोजना : रस शोषण करणार्या किडींच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आहेत.
१) डायमेथोएट (३०% प्रवाही) १० मिली किंवा मिथिल डिमेटॉन (२५% प्रवाही) १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) पिवळ्या रंगावर पांढरी माशी आकर्षित होत असल्यामुळे पत्र्यावर पिवळा रंग देऊन त्यावर एरंडीचे तेल लावावे. हे तयार केलेले पिवळ्या पत्र्याचे चिकट सापळे पिकात हेक्टरी १० ते १२ या प्रमाणात लावावेत. त्यावर या माशा चिकटतात, मात्र एक दिवसाआड पत्र्यावरचे तेल पुसून घेऊन पत्र्यावर परत तेल लावणे गरजेचे आहे.
सोयाबीनवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन :
१. नत्रयुक्त खतांचा समतोल वापर करावा.
२. पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणार्या पूरक खाद्य वनस्पतींचा नाश करावा.
३. आंतरमशागत, निंदणी व कोळपणी वेळेवर करावी.
४. खोडमाशी व चक्रीभुंगा या किडींचा प्रादुर्भाव झालेली कीडग्रस्त झाडे, फांद्या पानाच्या देठाच्या आतील अळीसह नष्ट कराव्यात.
५. खोडमाशी व चक्रीभुंगा या किडींचा दर वर्षी जास्त प्रादुर्भाव आढळून आलेल्या शेतात १०% दाणेदार फोरेट हेक्टरी १० लिटर या प्रमाणात पेरणीपूर्वी अवश्य मिसळावे.
६. तंबाखूच्या अळीकरिता तयार करण्यात आलेले कामगंध सापळे हेक्टरी १० या प्रमाणात लावावेत. त्यामध्ये आकर्षित होऊन अडकलेले पतंग नष्ट करावेत.
७. पिकामध्ये हेक्टरी २० ते २५ या प्रमाणात पक्षीथांबे उभारावेत.
८. पूर्ण वाढ झालेल्या पाने खाणार्या मोठ्या अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात.
९. उपद्रवग्रस्त पाने खाणार्या अळ्यांचा प्रादुर्भाव (अंडी व प्रथम/द्वितीय अवस्था) दिसताक्षणीच पाच % निंबोळी अर्काची फवारणी करावी.
१०. पांढर्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे हेक्टरी १० ते १२ या प्रमाणात लावावेत.
११. वरीलप्रमाणे योग्य ती उपाययोजना करूनही किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीत किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर त्वरित कीड नियंत्रणाचे उपाय योजावे. त्याकरिता शिफारशीनुसार दिलेल्या कीटकनाशकापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
१२. फवारणी पॉवर पंपाद्वारे करायची असल्यास कीटकनाशकाची मात्रा तीनपट करावी. प्रथम खोलगट भांड्यात पाणी घेऊन त्यात फवारणीचे औषध चांगले मिसळावे आणि नंतरच पंपात ओतावे. तसेच फवारणी झाडाच्या पानाच्या खालील बाजूने होईल, याची दक्षता घ्यावी.
(महाराष्ट्र शासन कृषि विभाग)