रायगड : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र अन्य एका जिल्ह्यातील पांढर्या कांद्याला भौगोलिक मानांकन अर्थात जीआय टॅग मिळाला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या पांढर्या कांद्याला आता भौगोलिक मानांकन मिळाले आहे. येथील पांढर्या कांद्याचा दर्जा, चव आणि उत्पादन क्षमता यावर हे भौगोलिक मानांकन मिळाले आहे. यामुळे पांढर्या कांद्याचे वेगळे असे महत्व तर राहणार आहेच पण येथील कांद्याला आता हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार असून उत्पादनातही वाढ होणार आहे.
एखाद्या वस्तूला किंवा पिकाला विशिष्ट ठिकाणाचा जीआय टॅग मिळाला की त्या सर्वांना त्या ठिकाणला एक वेगळे महत्व येते. अलिबागच्या पांढर्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळावे अशी मागणीच नव्हे तर गत दोन वर्षांपासून पाठपुरावा देखील सुरु होता. रुचकर आणि औषधी गुणधर्म असलेल्या अलीबागच्या पांढर्या कांद्याला अखेर भौगोलिक मानाकान प्राप्त झालं आहे. केंद्र शासनाच्या पेटंट विभागाने या बाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने या कांद्याला स्वतःची ओळख मिळाली आहे.
बाजारात दर्जेदार व अस्सल पांढरा कांदा ग्राहकांना मिळणार. त्यामुळे येथील शेतकर्यांचा उत्साह आता दुणावला असून यापेक्षा अधिकचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करणार आहेत तर उत्पन्नवाढीसह शेतकर्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पांढर्या कांद्याला अधिकचे महत्व प्राप्त होणार आहे. जीआय च्या नावाखाली ग्राहकांची होणारी फसवणूकही आता टळणार आहे