मुंबई : पारंपारिक शेतीची चौकट तोडून आधूनिक शेतीकडे शेतकर्यांचा कल वाढत आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची गरज भासत आहे. कृषी क्षेत्रातील नव तंत्रज्ञानापैकी एक म्हणजे, प्लांट पॅथॉलॉजी! (Plant Pathology) प्लांट पॅथॉलॉजीला फायटोपॅथॉलॉजी देखील म्हणतात. ही कृषी, वनस्पतिशास्त्र / जीवशास्त्राची शाखा आहे, ज्यामध्ये वनस्पतींच्या रोगांचा अभ्यास केला जातो. प्लांट पॅथॉलॉजिस्ट रोगांचे निदान करण्यासोबतच झाडे निरोगी ठेवण्याच्या पद्धतींचा अभ्यास करतात. आज आपण याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
वनस्पतींमधील रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन पद्धती विकसित करण्याचे आव्हान वनस्पती रोगशास्त्रज्ञांसमोर आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी संशोधन कार्याशी जोडले जाणे आवश्यक आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मायक्रोबायोलॉजी सोबतच जेनेटिक्स, मायक्रोकेमिस्ट्री, इकोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, पीक आणि मातीशी संबंधित विज्ञानाचा अभ्यास केला जातो.
कृषी विद्यापीठे प्लांट पॅथॉलॉजीमध्ये बीएससी पदवी अभ्यासक्रम देतात. काही बीएससी अभ्यासक्रम प्लांट पॅथॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन देखील देतात. प्लांट पॅथॉलॉजीच्या पदवी स्तरावरील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उमेदवाराला १२वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांसह किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमासाठी निवड ही प्रवेश परीक्षा आणि गुणवत्तेच्या आधारे केली जाते. शास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञ होण्यासाठी कीटकशास्त्र, नेमेटोलॉजी आणि तण विज्ञान इत्यादी विषयांशी संबंधित अभ्यासक्रम करता येतात. प्लांट पॅथॉलॉजिस्टची वार्षिक कमाई ४.५ ते ५.५ लाख रुपयांच्या दरम्यान सुरू होते. सरकारी खात्यात त्यांना ठरलेल्या नियमांच्या आधारे पगार मिळतो.