धानाच्या चुकऱ्यांसाठी ठोठावला छगन भुजबळ यांचा दरवाजा; वाचा सविस्तर

- Advertisement -

मोहाडी : दोन महिन्यापासून धानाचे चूकारे मिळाले नसल्याने बळीराजा चांगलाच अडचणीत आला आहे. तालुक्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यानी दोन महिन्यापूर्वी विकलेल्या धानाचे चुकारे केव्हा मिळणार ? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे तात्काळ देण्यात यावे व व्यापाऱ्यांचे धान खरेदीसाठी सूरू करण्यात आलेले धान खरेदी केंद्र बंद करावे, या संबंधीचे निवेदन अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे तालुका महासचिव सुनील मेश्राम, यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले आहे.

पणन व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन या अंतर्गत मोहाडी तालुक्यात खरेदी – विक्री संस्था, विविध कार्य.सेवा सहकारी संस्था, सहकारी भातगिरणी, सुशिक्षित बेरोजगार संस्था ईत्यादी संस्था धान खरेदी केंद्र चालवित आहेत. अ ग्रेड चे धान १८८८ रुपये क्विंटल तर ब ग्रेड चे धान १८६५ रुपए क्विंटल खरेदी केल्या जात आहे. एका एकराच्या सातबाऱ्यावर फ़क्त १४ क्विंटल धान घेतल्या जात आहे. शासनाने धान खरेदी केंद्रावर धान देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रती क्विंटल ७०० रुपए बोनस जाहीर केल्याने काही मोजक्याच शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर धान विक्री केले. त्या धानाचे दोन महिने उलटूनही चुकारे मिळाले नसल्याने आर्थिक व्यवहार कसा करावा या विवंचनेत शेतकरी आहेत.

व्यापाऱ्यांने धान केंद्रावर नेल्यास त्यांच्या धानाचे लवकर वजन केल्या जात होते आणी शेतकऱ्यांच्या धानाचे लवकर वजनमाप केले जात नव्हते. त्यामुळे व्यापाऱ्याना धानाचे चुकारे मिळाले व शेतकऱ्याचे धानाचे चूकारे अडले. आता शेतकऱ्यांजवळ कुठलाही धान राहिलेला नसताना गावागावात दररोज धान खरेदी केंद्र उघडल्या जात आहेत. रातोरात त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचा धान मोठंमोठ्या ट्रकद्वारे उतरवल्या जात आहे. अनेक बोगस सुशिक्षित बेरोजगार संस्थाच्या नावे धान खरेदी केंद्र सूरू आहेत याला लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे.

काही भुरटे स्वयंघोषित व्यापारी बाहेर जिल्ह्यातून कमी भावात धान खरेदी करून ते धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्रीस आणत आहेत. नातेवाईकाना आमिष दाखवुनत्यांचा सातबारा, नमुना आठ, आधार कार्ड, बँकेची पासबुक मागून त्यांच्या नावाने धानाचे चुकारे काढत आहेत. शेतकऱ्याच्या धानाला योग्य भाव मिळावा म्हणून शासन दरवर्षी धान खरेदी केंद्र सूरू करते. मात्र या केंद्राचा फायदा शेतकऱ्यापेक्षा व्यापारी, विविध संस्थाचे संचालक व त्यांचे नातेवाईक घेतात. मोहाडी तालुक्यातील एका धान खरेदी केंद्रावर रात्रीच्या वेळेस व्यापाऱ्यांचे दररोज मोठमोठे ट्रक धान भरून विक्रीस येत होते. याकडे जिल्हा मार्केटींग फेडरेशनने संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. ज्यांची देखरेख असते त्या कर्मचाऱ्याची दिवाळी साजरी होत असल्याने तेही धान खरेदी केंद्राकडे ढुंकूनही पाहत नाही. हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत धान खरेदी केंद्र उघडते. या केंद्रावर फक्त शेतकऱ्यांनी आणलेला धानच खरेदी करावा असे असताना स्वहितासाठी न खरेदी केंद्र चालक व्यापाऱ्याचे धान खरेदी करीत आहेत.

काही व्यापारी, उद्योजक, राजकारणी यांनी स्वतःच्या नातेवाईकाच्या नावाने सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत. त्या संस्थाना धान खरेदी केंद्र मिळाले असल्याने त्यांनी बाहेर खरेदी केलेले धान सहजपणे खरेदी केंद्रावर विकत असल्याचे चित्र बऱ्याच केंद्रावर आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून भ्रष्टाचार करीत असलेले धान खरेदी केंद्र बंद करावे व शेतकऱ्यांचे चूकारे तात्काळ देण्यात यावे. अशी मागणी अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे तालुका महासचिव सुनील मेश्राम यांनी ना.छगन भुजबळ व ना.बाळासाहेब पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

हे देखील वाचा :

हे देखील वाचा