जळगाव : मे महिन्यात कापूस लागवडीची धावपळ सुरु होते. ज्या शेतकर्यांकडे पुरेसे पाणी उपलब्ध आहे ते पूर्वहंगामी कापशीची लागवड करतात. मुख्य उत्पादनासह फरदडचे अतिरिक्त उत्पादन घेण्याकडे अनेक शेतकर्यांचा कल असतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीमुळे पिकाचे मोठे नुकसान होते. कपाशीची फरदड घेणे, त्यानंतर पूर्वहंगामी कापूस लागवड अशा प्रकारे पीक सतत शेत परिसरामध्ये उपलब्ध असल्याने या किडीसाठी खाद्याची उपलब्धता वर्षभर होत राहते. यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतच राहतो. या किडीचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत पिकांचे अवशेष व्यवस्थित नष्ट करणे या बरोबरच पूर्वहंगामी कपाशी लागवड करण्याचे टाळणे आवश्यक आहे. नवीन लागवड ही जून महिन्यांमध्ये ८०-१०० मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी, असे तज्ञांचे मत आहे.
हंगाम संपल्यावर शेवटच्या पिढीतील गुलाबी बोंड अळ्या या प्रादुर्भावग्रस्त बोंडे, परतीची पर्हाटीची धसकटे अथवा मातीत सुप्तावस्थेत जातात. गुलाबी बोंडअळीचा पुढील प्रसार थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असते. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, पूर्वहंगामी कापसाची पेरणी करणे टाळावे. लवकर पेरलेल्या कपाशीवर लवकर पात्या, फुले येतात. पावसाबरोबर सुप्तवास्थेतून बाहेर पडणारे गुलाबी बोंड अळीचे पतंग अशा पूर्वहंगामी पिकाच्या पात्या व फुलांवरच आपली अंडी देतात. इतरत्र कापसाचे पीक नसल्यामुळे लवकर पेरलेले कपाशीचे पीक गुलाबी बोंड अळीला बळी पडू शकते.
पेरणी जून महिन्यात केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी राखण्यास मदत होते. लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरणी करून मशागत करावी. मातीत लपलेले कोष व सुप्तावस्थेतील अळ्या वर येऊन उन्हाळ्यातील प्रखर जास्त तापमानामुळे मरून जातात. कपाशी हेच गुलाबी बोंड अळीचे एकमेव खाद्य आहे. त्यामुळे पिकाची फेरपालट केल्यास खाद्य पिकाअभावी गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रसशोषक किडीसाठी प्रतिरोधक व कमी कालावधीत येणार्या आणि लवकर परिपक्व होणार्या वाणांची निवड करावी. यामुळे सुरुवातीच्या अवस्थेतील रसशोषक कीड नियंत्रणासाठी अनावश्यक कीटकनाशकाची फवारणी टाळता येते.