शेत शिवार । पुणे : कृषी उत्पादन वाढविण्यासाठी काही प्रगतीशील शेतकरी नवं नवे प्रयोग करत असतात. असाच एक अफलातून प्रयोग उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेमध्ये करण्यात आला आहे. येथे एकाच खुंटरोपावर वांगी आणि टोमॅटोचे दुहेरी जोड कलम करून दोन्ही फळभाज्यांचे एकाच वेळी उत्पादन घेण्याचा प्रयोग करण्यात आला. या झाडास ‘ब्रिमॅटो Brimato’ असे नाव देण्यात आले आहे. या अनोख्या प्रयोगात एका झाडापासून सरासरी ३६ टोमॅटो आणि ९ वांग्यांचे उत्पादन मिळाले. शहरांमध्ये व्हर्टिकल गार्डनच्या मदतीने देखील तंत्र अधिक उपयोगी ठरू शकते.
फळ झाडांपासून उत्पादन वाढविण्यासाठी एकाच कुळातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त कलम काड्यांचा उपयोग केला जातो. आता भाज्यांचे उत्पादन घेणे देखील शक्य झाले आहे. भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगात वांग्याचे संकरित वाण ‘काशी संदेश’ आणि टोमॅटोचे सुधारित वाण ‘काशी अमन’ यांची कलम काडी म्हणून निवड करण्यात आली. खुंट काडीकरिता आयसी १११०५६ या वांगी वाणाचा वापर करण्यात आला.
अशा पध्दतीने तयार केले कलम
या कलम काडी काढणीसाठी वांग्याची २५ ते ३० दिवसांची आणि टोमॅटोची २२ ते २५ दिवसांची रोपे निवडण्यात आली. टोमॅटो आणि वांग्याची कलम काडी काढून, त्यांचे वांग्याच्या ‘आयसी १११०५६’ या जातीच्या खुंटरोपावर जोड कलम पद्धतीने कलम बांधण्यात आले. कलम काडी आणि खुंट रोपावर ५ ते ७ मिमी लांबीचा तिरकस (४५ अंशाचा) छेद घेऊन जोड पद्धतीने कलम बांधण्यात आले. कलम बांधणी केलेली रोपे शेडनेटमध्ये नियंत्रित वातावरणात ठेवण्यात आली. सुरवातीचे १५ दिवस तापमान, आर्द्रता आणि नव्या कलमाला झेपेल इतक्या प्रकाशात ठेवण्यात आले.
कलम बांधणीनंतर १५ ते १८ दिवसांनी शेतामध्ये रोपांची पुनर्लागवड करण्यात आली. वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत दोन्ही कलम काड्यांची समान वाढ होईल याकडे विशेष लक्ष देण्यात आले. कलम बांधणीच्या खाली खुंटरोपावर वाढणारे फुटवे त्वरित काढून टाकले. शेतामध्ये कलम केलेल्या रोपांना २५ टन कंपोस्टखत, नत्र, स्फुरद आणि पालाश १५०:६०:१०० किलो प्रति हेक्टर या प्रमाणे मात्रा देण्यात आली. साधारणपणे लागवडीनंतर ६० ते ७० दिवसांनी वांगी आणि टोमॅटोमध्ये फळधारणा होण्यास सुरवात झाली.