शेतशिवार । औरंगाबाद : कृषी क्षेत्रासमोर मोठे संकट दशकभरापासून निर्माण झाले आहे. कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी प्रचंड हैराण झाला आहे. यामुळे या भागात आता हवामानाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी औरंगाबादमध्ये ‘सी बँड रडार’ डॉपलर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज येणार असल्याने शेती व्यवसयातील होणारे नुकसानही टळणार आहे. याकरिता केंद्र सरकारच्या पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाने परवानगी दिलेली आहे. मराठवाड्यासह विदर्भाचा काही भाग, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील शेती व शेतकर्यांना फायदा होईल.
तब्बल ३०० ते ४०० किमीचा परिसर नियंत्रणात
‘सी बँड डॉपलर रडार’ उभारण्यात आल्याने या रडारच्या नियंत्रणात तब्बल ३०० ते ४०० किमीचा परिसर नियंत्रणात येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना हवामान बदलाचा अचूक अंदाज मिळणार आहे. त्यानुसार काय उपाययोजना करायच्या याकरिता वेळ असणार आहे. परिणामी होणारे नुकसान टाळण्यासाठी हा उपक्रम फायद्याचा ठरणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे दुष्काळ, अतिवृष्टी, ढगफुटी यापासून पिकाचे संरक्षण करता येणार आहे. रडार कार्यन्वित होताच हवामानाचा अचूक अंदाज शेतकर्यांना मिळणार आहे. विज कुठे पडणार आहे, भविष्यात पावसाचे प्रमाण किती राहणार आहे? ढगफुटीची शक्यता असेल तर किती परिसरात याचा परिणाम होणार आहे याची माहीती शेतकर्यांना मिळणार आहे. देशात ९ ठिकाणी, असे रडार बसविले जाणार आहेत.
दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टळणार
मराठवाडा विभागातील औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये हवामान आणि तापमानात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे शेती उत्पादनावर याचा मोठा परिणाम होत आहे. कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यासारखी परस्थिती निर्माण होत आहे. गेल्या दहा वर्षात नापिकी आणि वाढत्या कर्जबारीपणामुळे शेतकर्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. तर शेतकर्यांच्या उत्पादनातही घट झाल्याचे समोर आले आहे. या अनुषंगाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करून, सी बँड डॉपलर रडार संदर्भात आग्रही मागणी व त्यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर त्याला मान्यता मिळालेली आहे.