भारतामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. १९६० पर्यंत भारतीय शेतकरी या शेतीवर अवलंबून होता ती सेंद्रिय शेतीच होती. हरित क्रांतीपासून रासायनिक खते, बुरशीनाशके, किटकनाशके, तणनाशके व संजिवके यांचा भरमसाठ वापर झाला. जनावरांच्या दुधासाठी संप्रेरके वापरण्यास सुरुवात झाली. त्याच्या वापरामुळे देशाच्या एकूण उत्पादनात भरीव वाढ झाली. रासायनिक खतांचा पीक उत्पादन वाढीसाठी होणार्या फायद्यामुळे सेंद्रिय खतांच्या वापराकडे शेतकर्यांचे दुर्लक्ष झाले.
अलिकडच्या काळात जमिनीच्या आरोग्यावर परीणाम होऊन उत्पादीत मालाच्या प्रतीवरही परिणाम झाला. मानवावर आणि पशुपक्षी यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवू लागले. गेल्या दोन दशकात पशुधनामध्ये घट होत असल्याने एकूण शेणखताची उपलब्धता सातत्याने कमी होत गेली. अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी ऊस, कापूस, गहू, भाजीपाला पिके आणि फळबागांना आवश्यकतेपेक्षा जास्त खते आणि पाण्याचा वापर करण्यात आला. या पध्दतीने उत्पादन खर्चात वाढ तर झालीच पण त्याचबरोबर जमिनीची रासायनिक, भौतिक आणि जैविक गुणवत्ता कमी होत गेली.
उष्ण हवामानामुळे महाराष्ट्राच्या जामिनीत सेंद्रिय कर्बाचा हास झपाट्याने होत आहे. त्याचे जामिनीतील प्रमाण ०.२-०.५% इतके दिसून येते. या सर्व प्रश्नांवर जामिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कसे वाढविता येईल हाच पर्याय शिल्लक राहतो. सातत्याने अधिक उत्पादन देणारी ठराविक पिकेच वर्षानुवर्षे त्याच जमिनीत घेतली गेल्याने काही नवीन रोग आणि किडी या पिकांवर दिसू लागल्या. सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये सर्व प्रकारची रासायनिक खते आणि औषधांचा वापर पूर्णपणे बंद करुन सेंद्रिय पदार्थांचाच वापर केला जातो. त्यामुळे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
अन्नद्रव्य व्यवस्थापन
सेंद्रिय शेतीसाठी शेणखत, कंपोस्ट खत, कोंबडी खत, लेंडी खत, हिरवळीचे खत, गांडूळ खत या भरखतांचा आणि अखाद्य पेंडीचा जोरखतासाठी वापर करता येतो. सेंद्रिय शेतीत उपयुक्त जीवाणूचे प्रमाण वाढविण्यासाठी रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, अॅसिटोबॅक्टर, स्फूरद विरघळविणारे जीवाणू या जीवाणू खतांचा पिकानुसार पूरक खते म्हणून वापर केल्याने उत्पादनात ८ ते १० टक्के वाढ होते. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीत योग्य पिक पद्धतीचा अवलंब केल्याने जमिनीचा पोत सुधारून आर्थिक फायदा होतो. सेंद्रिय शेतीत पिकांच्या गरजेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे लागते. त्याचबरोबर विविध जैविक द्रावणांचा, जीवामृत, ई.एम., गांडूळ पाणी, गोमुत्र इत्यादींचा वापर सेंद्रिय शेतीत करणे शक्य होत आहे. याशिवाय जैविक पीक संरक्षण शिफारसीचा वापर रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी करावा लागतो. जैविक किड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क व निमार्कचा वापर करावा.
बीजामृत (बीजप्रक्रिया)
बियाणे बीजप्रक्रियासाठी बीजामृत वापरता येते. बीजामृत तयार करण्यासाठी गाईचे शेण ५ किलो, गोमूत्र ५ लिटर, दूध १ लिटर, चुना २५० ग्रॅम, हे मिश्रण रात्रभर भिजवून दुसर्या दिवशी बीजप्रक्रियेसाठी वापरता येते.
जीवामृत
गाय अथवा बैलाचे शेण १० किलो, १० लिटर गोमूत्र, २ किलो गूळ, बेसनपीठ २ किलो, १ किलो वनातील माती हे मिश्रण प्लास्टीकच्या ड्रममध्ये २०० लि. पाण्यात ५-७ दिवस आंबवून दररोज ३ वेळा मिश्रण ढवळून घेणे. सदरचे मिश्रण १ एकर क्षेत्रासाठी पाण्यावाटे पिकास देता येते.
अमृतपाणी
गाईचे शेण १० किलो, गाईचे तूप २५० ग्रॅम आणि गूळ / मध ५०० ग्रॅम हे मिश्रण २०० लि. पाण्यात मिसळून तयार केलेले अमृतपाणी ३० दिवसांच्या अंतराने १ एकर क्षेत्रासाठी पाण्याद्वारे द्यावे. त्यानंतर १ महिन्याने झाडांच्या २ ओळींमध्ये पाण्यातून देता येते.
दशपर्णी
मर रोग, मूळकुजव्या, भुरी, केवडा, करपा, तेल्या या रोगांच्या नियंत्रणासाठी १० वनस्पतींचा (नीम, कन्हेर, निर्गुडी, घाणेरी, पपई, सिताफळ, गुळवेल, एरंड, करंज, रूई) २०-२५ किलो पाला, २ किलो हिरव्या मिरचीचा ठेचा, २५० ग्रॅम लसूण, ३-४ किलो शेण, ३ लि. गोमूत्र हे मिश्रण २०० लि. पाण्यात मिसळून दारोज ३ वेळा मिश्रण ढवळून १ महिना आंबवून पिकावर फवारणीसाठी वापरतात. अशा प्रकारे २०० लि. अर्कामधून गाळलेला ५ लि. दशपर्णी अर्क + ५ लि. गोमूत्र २०० लि. पाण्यात मिसळून रोग व किडिंच्या नियंत्रणासाठी वापरता येते.
पंचगव्य
शेण ५ किलो, नारळाचे पाणी/गोमूत्र ३ लि., गाईचे दूध २ लि., तूप १ किलो हे मिश्रण ७ दिवस आंबवून दिवसातून २ वेळा हलवावे. तयार झालेले पंचगव्य १० लि. पाण्यात मिसळून जमिनीवर पाण्यावाटे फवारावे. एकरासाठी २० लि. पंचगव्य वापरता येते.
सेंद्रिय हळद लागवड
सेंद्रिय पद्धतीने हळद लागवडीपासून अधिक आर्थिक फायदा मिळवण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी लागवडीच्या वेळी ११ टन गांडूळखत प्रति हेक्टरी देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. लागवडीच्या वेळी गांडूळखताबरोबर स्फुरद विरघळणारे जीवाणू अझोस्पिरिलम आणि फुले ट्रायकोडर्मा प्लस प्रत्येकी ५ किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात मिसळून द्यावे. हळदीमधील कंद कुज रोगाच्या नियंत्रणासाठी हळदीचे कंद फुले ट्रायकोडर्मा प्लस मध्ये (५ ग्रॅम प्रति लिटर) ५ मिनिटे बुडवून लावावेत.
सेंद्रिय सोयाबीन आणि कांदा लागवड
सोयाबीन (खरीप) – कांदा (रब्बी) या पिक पध्दतीमध्ये सेंद्रिय शेतीसाठी नत्र व स्फुरदयुक्त जीवाणू खताची बिजप्रक्रिया करून सोयाबीन पिकास हेक्टरी ५० किलो आणि कांदा पिकास १०० किलो नत्राची मात्रा प्रत्येकी १/३ नत्र अन्नद्रव्य आधारीत प्रमाणानुसार शेणखत, गांडुळखत आणि निंबोळी पेंड या सेंद्रिय खताव्दारे देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
(साभार : कृषिदर्शनी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी)