औरंगाबाद : सध्या रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, आदी पिकांची काढणी सुरू आहे. काढलेला शेतमाल व्यवस्थित साठवण करून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. अशातच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत २१ व २२ एप्रिलला अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ.के.के. डाखोरे यांनी मराठवाड्याच्या उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात २१ आणि २२ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, मराठवाड्यात मागील काही दिवसांत ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा काही अंशी कमी होत होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून हळूहळू उन्हाचा जोर वाढत असून तापमानाचा पारा वर चढत आहे. दुपारनंतर उन्हाचे चटकेही बसत आहेत. सोमवारी परभणीत ४१.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. अशातच आता अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतीची उरलीसुरली कामे लवकर आटोपण्यासाठी शेतकरी भरउन्हात ही कामे करत आहेत.