जळगाव : खरीप हंगामातील पिके जवळजवळ पक्व आणि तयार आहेत. पिक काढणीदरम्याना शेतकर्यांसमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे मजूर टंचाई! अनेकवेळा जास्त मजूरी देवूनही वेळेवर मजूर मिळत नाही. परिणामी शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागते. आज आपण पिक कापणीच्या अशा यंत्राबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्याच्या मदतीने शेतकरी श्रम, पैसा आणि वेळेचीही बचत करु शकतात. विशेष म्हणजे या यंत्राव्दारे आंतरमशागत व हार्वेस्टींगदेखील करता येते.
कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात भाताचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यासह राज्यात हरभरा, सूर्यफूल, मोहरी, सोयाबीन, गहू या पिकांचे क्षेत्र देखील मोठे आहे. या पिकांच्या काढणीसाठी कम्बाईन हार्वेस्ट मशिन किंवा रीपर मशील हे उत्तम पर्याय आहेत. मात्र याचा वापर सर्वच शेतकर्यांना परवडत नाही. यावर उत्तम पर्याय म्हणजे, ब्रश कटिंग मशिन. या यंत्राच्या मदतीने एक व्यक्ती अत्यंत कमी खर्चात व कमी वेळेत मोठ्या क्षेत्रावरील पिक काढणी सहज करु शकतो. या यंत्राचा वापर शेत साफसफाईसाठी देखील करता येतो.
याबाबत कृषीतज्ञ तथा हिराअॅग्रोचे संचालक गिरीष खडके म्हणाले की, कडधान्य, हरभरा, सोयाबीन यासारख्या लहान पिकांच्या काढणीसाठी शेतकर्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. पिकाची उंची कमी झाल्यामुळे पीक धरता येत नाही, त्यामुळे शेतकर्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे, मात्र ब्रश कटिंग मशिनच्या सहाय्याने पिक कापणी सहज करता येते. या मशिनला मिनी हार्वेस्टींग मशिन असे देखील म्हटले जाते. हे मशिन ७ ते १२ हजार रुपयांदरम्यान उपलब्ध आहे. तण काढणी, दिलेली खते मिसळणे, फळबागांसाठी हे अत्यंत उपयोगी असते. याला वेगवेगळी अॅटचमेंट येतात ज्याच्या मदतीने आंतरमशागत देखील करता येते. आंतरमशागत व हार्वेस्टींगदेखील करता येते. यासोबत वॉटर पंप देखील येतो. याच इंजिनचा वापर करुन मोटारचा वापर करु शकतात, असेही श्री खडके यांनी सांगितले. यात २ स्ट्रोक व ४ स्ट्रोक इंजिन येतात. आम्ही २ स्ट्रोक इंजिनची शिफारस करतो, असेही श्री. खडके यांनी नमूद केले.