जळगाव : भारतातील कृषिक्षेत्राला भविष्य असून जवळपास १२ कोटी हून अधिक शेतकरी योगदान देत आहे. यातील ८० लाखाच्यावर शेतकऱ्यांपर्यत कंपनीचे तंत्रज्ञान, उत्पादने पोहचलेले आहे. येणाऱ्या काळात शाश्वत शेतीसाठी नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषि क्रांती अनुसंधान आणि विकास घडवून आणायचा आहे. त्यासाठी पाणी बचतीसह हवामानातील बदलांवर तग धरणारे आधुनिक उच्च कृषि तंत्रज्ञान देशातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवायचे आहे. यासाठी नवीन व्यवसाय मॉडेल विकसीत करू असा आत्मविश्वास जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केला.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनिल जैन बोलत होते. बांभोरी येथील प्लास्टिक पार्कच्या प्रशासकीय इमारतीसमोरील पटांगणावर झालेल्या सभेच्या व्यासपीठावर अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, सहव्यवस्थापकिय संचालक व चिफ फायनन्शिअल ऑफिसर अतुल जैन, संचालक डी. आर. मेहता, डॉ. एच. पी. सिंग, घनश्याम दास तसेच जैन परिवारातील ज्येष्ठ सदस्य दलिचंद जैन आणि जैन फार्मफ्रेश फूड्सचे संचालक अथांग जैन उपस्थित होते. तसेच ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कंपनीचे अन्य संचालक व सेक्रेटरी ए. व्ही. घोडगावकर व ऑडिटर्स उपस्थित होते.
सुरवातीला गत वर्षात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सभेचे कामकाज सुरू केले. आरंभी सभेतील महत्त्वाच्या विषयांना सर्वांनूमते मंजूरी देण्यात आली. त्यानंतर डी. आर मेहता यांनी संचालक मंडळाच्या वतीने मनोगत व्यक्त केले. यात ते म्हणाले, ‘जैन इरिगेशन कंपनीने विज्ञानासोबत कृषिक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविले आहे. जागितक कठीण परिस्थितीही भागधारक, सहकारी, वितरक, बॅंक व हितचिंतक कंपनीच्या पाठीशी एकजूटीने उभे राहिले. सर्वांच्या सहकार्य आणि विश्वासामुळे पूर्वीपेक्षाही कंपनी अधिक प्रगती करेल असा विश्वास डी. आर. मेहता यांनी व्यक्त केला.’
अनिल जैन यांनी कंपनीचा ताळेबंद सादर केला. आव्हानात्मक परिस्थितीत ही कंपनीने ऑपरेटिंग लिव्हरेज वाढवणे, खर्चाचे योग्य व्यवस्थापनामुळे एकत्रित महसूलात २६ टक्क्यांची वाढ झालेली आहे. कंपनीच्या स्तरावर व जागतिक स्तरावर कंपनीची आर्थिक वाटचाल समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीतील शाश्वत भविष्यासाठी पाण्याची बचत महत्त्वाची आहे यासाठी कंपनीने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवे उत्पादन विकसीत केले आहे याचा अल्पभूधारक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. ‘हवामानातील बदल हे शेतकऱ्यांपुढील आव्हान आहे त्याला उत्तर फक्त जैन तंत्रज्ञान आहे’ असेही अनिल जैन म्हणाले. सिंगापूर येथील टेमासेकच्या रिव्हूलिस कंपनी सोबत आंतरराष्ट्रीय एकत्रिकरणामुळे २६०० कोटी रूपयांचे कर्ज कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य होत आहे, असा विश्वास अनिल जैन यांनी व्यक्त केला.