नांदेड : नांदेड जिल्ह्यातील नांदुसा गावात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचं मोठं नुकसान झालंय. नांदेड, हिंगोली भेटीदरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बहुतांश शेतकर्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. पण ज्या शेतकर्यांची भेट घेण्याचं राहिलं होतं, त्यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. सरकार शेतकरी आणि कष्टकरी जनेते असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत ठोस निर्णय घेऊन अपेक्षेपेक्षा जास्त मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
नांदेड तालुक्यातील नांदुसा गावचे सरपंच भास्कर जानकवडे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यावेळी गावातील इतर शेतकरी देखील उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय.
तुमचं शेत पाहणं राहून गेलं, पण तुम्ही कोणतीही काळजी करु नका, पंचनामे झाले का? आम्ही लवकरच मदत जाहीर करणार आहोत, अपेक्षेपेक्षा जास्त मदतीची घोषणा हे सरकार करेल, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना धीर दिला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वसनामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांचा जीव भांड्यात पडला आहे.