पुणे : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज आणि त्यातही मॉन्सूनपूर्व पावसाने लावलेली हजेरी, यामुळे खरिप हंगामाची तयारीला वेग आला आहे. यंदा महाबीज व कृषी विभागाच्या नियोजनामुळे बियाण्यांची चिंता शेतकर्यांना वाटत नसली तरी त्यांना रासायनिक खतांची चिंता सतावत आहे.
कृषी विभागाकडील माहितीनुसार, खरीप हंगामात राज्यासाठी १७ लाख ९५ हजार क्विंटल बियाणांची आवश्यकता असताना कृषी विभाग येथील खासगी संस्थांकडे तब्बल १९ लाख ८८ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असणार आहे. यामुळे शेतकर्यांनी बियाण्यांची चिंता संपली आहे.
खरिप हंगामातील शेतकर्यांसाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे रासायनिक खतांची उपलब्धता! प्राप्त माहितीनुसार, हंगामासाठी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ४५ लाख २० हजार मे.टन रासायनिक खत उपलब्ध होणार असून त्यापैकी ९ लाख ८ हजार लाख मे.टन पुरवठा झाला आहे. सध्या राज्यात १६ लाख ९८ हजार मे. टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे. मागणी व पुरवठा यात मोठी तफावत असल्याने ऐन हंगामात खत टंचाई निर्माण होण्याची भीती शेतकर्यांना सतावत आहे. मात्र शेतकर्यांनी काळजी करण्याची कारण नाही. वेळेनुसार सर्वांना मुबलक प्रमाणात खते उपलब्ध होतील, असा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.
आंतराष्ट्रीय बाजारामध्ये खताच्या किंमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे युरिया, डी.ए.पी चे दर वाढले असले तरी येणार्या काळात ते स्थिर ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रयत्न सुरु आहेत. खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.