जळगाव : यंदाच्या अर्थसंकल्पात केळीचा फळपिकामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता इतर पिकांप्रमाणे केळी लागवडही ‘मनरेगा’ च्या माध्यमातून करता येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना उत्पादनावर होणारा खर्च तर कमी होईलच पण नुकसानी दरम्यानची मदतही मिळणार आहे. याचा सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांनाच होईल कारण राज्यात केळीचे सर्वाधिक उत्पादन जळगाव जिल्ह्यातच घेतले जाते.
मनगेरा अर्थात रोजगार हमी योजनेअंतर्गत आतापर्यंत आंबा, लिंबू, मोसंबी या फळपिकांची लागवड केली जात होती. आता यामध्ये यंदाच्या वर्षापासून केळीचाही समावेश असणार आहे. त्यामुळे केळीचे उत्पादन घेताना जो खर्च होत होता त्याला कुठेतरी ब्रेक लागणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, फळपिकांसाठी या योजनेतून अनुदान दिले जाते. फळबाग लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्यापासून ते लागवडीपर्यंत आणि त्यानंतर देखभालीसाठी योजनेतील मजुरीच्या दराप्रमाणे मजुरी दिली जाते. एवढेच नाही तर रोपेही शासनाकडूनच पुरवली जाणार आहेत.
दीड लाखांचे अनुदान मिळणार
याचा लाभ घेण्यासाठी त्यामुळे शेतकर्यांनी केळी लागवडीची माहिती आणि सातबारा, ८ ‘अ’, कृषीविभागाकडे जमा करुन योजनेत सहभाग नोंदवायचा आहे. त्यामुळे शेतकर्यांना लागवडीपासून ते देखभालीपर्यंतसाठी दीड लाखाचे अनुदान मिळणार आहे. शिवाय दरम्यानच्या काळात निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले तरी त्याची भरपाई मिळणार आहे.