शेत शिवार । मुंबई : यंदा अतिवृष्टी, वादळी पाऊस व पूरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्यांना याचा सर्वाधिक फटका बसला. काही ठिकाणी ऐन कापणीला आलेले पिकं हातातून निघून गेले. अतिवृष्टीमुळे शेतात व शेतकर्यांच्या डोळ्यात असे दोन्ही ठिकाणी पाणी आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र पीक विमा कंपन्यांना नुकसानीची माहिती न देता आल्याने लाखो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता होती. मात्र संकटकाळी शेतकर्यांना केंद्र सरकारने मदतीचा हात दिला आहे.
शेतकर्यांना घरबसल्या नुकसानीची माहिती नोंदविण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी Pradhanmantri Pik Vima Yojna ‘क्रॉप इन्शुरन्स’ Crop Insurance App हे विशेष अॅप तयार केले आहे. यावर शेत सर्व्हे क्रमांक व नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील देता येतो.
विमा कंपन्या नेमका ‘या’ गोष्टीचा फायदा उचलत असे
प्रत्येक हंगामात शेतकर्यांचे या-ना त्या कारणांनी नुकसान होत असते. खरीप हंगामातील पिकांसाठी गेल्या वर्षीपासून पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीने पिकाच्या नुकसानीची माहिती ही नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आता विमा कंपन्यांना देणे बंधनकारक आहे. नुकसान झाल्यानंतर शेतकरी प्रचंड अस्वस्थ होतो. धक्क्यातून सावरण्यास त्याला वेळ लागतो. परिणामी अनेक शेतकरी हे त्यांच्या पिकाच्या नुकसानीची माहिती देऊ शकत नव्हते. नेमकी हिच बाब विमा कंपन्यांच्या पथ्यावर पडत असे. थोडा उशिर झाल्यानंतर या कंपन्या पात्र शेतकर्यांचे विम्याचे प्रस्ताव देखील नाकारत असल्याने शेतकर्यांच्या संकटात अजून एक भर पडत असे. यामुळे केंद्र सरकारने शेतकर्यांसाठी विशेष अॅप तयार करत त्यांना घरबसल्या झालेल्या नुकसानीची माहिती देण्याची सोय उपलब्ध करुन दिली.
या नुकसानीसाठी मिळते मदत
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, अतिवृष्टी, पूरस्थितीने पिकाचे नुकसान झाल्यास, ढगफुटी आणि वीज कोसळल्यामुळे लागणार्या आगीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना त्याची नुकसान भरपाई मिळते. यासाठी शेतकर्यांनी आपापल्या पीक नुकसानीची माहिती ही पिकाचे नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आत विमा कंपन्यांना कळविणे अनिवार्य आहे. यासाठी शेतकर्यांनी क्रॉप इन्शुरन्स अॅप, विमा कंपन्याचे टोल फ्री क्रमांक, बॅक, कृषी व महसूल विभाग यापैकी कोणत्याही एका यंत्रणेला नुकसानीची माहिती कळविली पाहिजे.