अकोला : जुलै महिन्यात झालेल्या सलगच्या पावसामुळे खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण आता पिकांची वाढ होणार कशी असा सवाल उपस्थित होत आहे. आधीच सतत पाण्यात असलेली अनेक पिकं सडू लागली आहेत. काही ठिकाणी ती पिवळी देखील पडत आहेत. या संकटात भरात भर म्हणून काय ते पण वन्य प्राण्यांनीही पिकं फस्त करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे यंदाचा पूर्ण हंगाम हातातून जातो कि काय? अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे.
निसर्गाचा लहरीपणाबरोबरच पिकांना वन्यप्राण्यांचाही धोका वाढत आहे. खरीप आणि रब्बी हंगामातही या समस्या निर्माण होत आहेत. जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात सोयाबीन, कपाशी, उडीद, मुग इत्यादी प्रकारची पिके ही वाणी, हरीण आणी रानडुकरांनी फस्त केल्यामुळे पिके येण्यापूर्वीच शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. आता कुठे पावसाने उघडीप दिल्यानंतर मशागतीची कामे करता येतील म्हणून पीक पाहणी करीत असताना वेगळेच वास्तव समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेत शिवरात पाणी साचून राहिले आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी नुकसानीच्या खुणा ह्या कायम आहेत. शिवाय पावसामुळे शेतामध्ये मार्गस्थही होता येत नाही. त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्तही करता आलेला नाही. पावसाची उघडीप आणि पोषक वातावरणामुळे पीक वाढ जोमात होत आहे. पण वन्य प्राण्यांचा बंदोबस्त झाला तरच पीक शेतकर्यांच्या पदरात पडणार आहे. शेतकर्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यांना वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत. यामाध्यमातून वन्यप्राण्यांकडून जरी पिकाचे नुकसान झाले तरी त्याची भरपाई ही मिळणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.