हिंगोली : मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, बीड जिल्ह्यामध्ये मृगाच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे एकीकडे खरिप हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने दिलासा मिळाला असला तरी अंतिम टप्प्यात असलेल्या केळी बागा मात्र आडव्या झाल्या आहेत. ऐन काढणीच्या प्रसंगीच वादळी वार्याने बागा आडव्या झाल्याने शेतकर्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील वसमत तालुक्यात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ज्या कुरुंदा आणि गिरगांव मंडळात केळीचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. याच भागात वादळी वार्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने दोन्ही मंडळातील केळीच्या बागा ह्या आडव्या झाल्या आहेत.विशेष म्हणजे सध्या निर्यातक्षम केळीची काढणी सुरु होती. पूर्ण क्षमतेने पोसलेली केळी आता मातीमोल झाली आहे.
पाऊस आणि वादळी वार्याने शेतकर्यांच्या तोंडचा घास हिसकावला आहे. केळी उत्पादक शेतकरी पीकविम्याचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी योजनेत सहभागी तर होतात मात्र, विमा कंपन्यांकडून केळी उत्पादकांना डावलले जाते. त्यामुळे यंदाच्या विमा योजनेत शेतकर्यांनी सहभागच नोंदवला नाही. शिवाय पीकविम्याचे निकष हे बदलले असल्याने अनेक केळी उत्पादकांना विमाच भरला नाही. त्यामुळे सरकारने कोणतेही निकष न लावता सरसकट एकरी २ लाखाची मदत करण्याची मागणी शेतकर्यांची आहे.