उन्हाळी पिकांसाठी असे करा नियोजन

- Advertisement -

भुईमूग

पेरणीनंतर नांग्या आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरावेत. १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्यात. २ खुरपण्या कराव्यात.

कांदा 

कांदा पिकावर सध्याच्या वातावरणामुळे फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हे प्रमाण फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत वाढत राहते. त्याच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मिलि + स्टिकर १ मिलि 

करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास, वरील कीटकनाशकासोबत मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मिलि प्रति लिटर या प्रमाणात वापरता येईल. ही फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी.

हरभरा

हरभऱ्यात मोठ्या अवस्थेतील घाटे अळी आढळून येत असल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी
इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के दाणेदार) ०.४ ग्रॅम. (एकरी २०० लिटर पाणी).
पिवळी पडलेली रोगग्रस्त झालेली किंवा वाळलेली झाडे उपटून नष्ट करावी.
हरभरा पिकामध्ये खुजा (विषाणूजन्य) रोगाचा प्रसार मावा किडीमुळे होतो, त्याकरिता रोगग्रस्त उपटून नष्ट करावीत. किंवा डायमेथोएट (३०% ईसी) या कीटकनाशकाची १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

वांगी लागवड

वांगी रोपांची लागवड फेब्रुवारी ते मार्च दरम्यान केली जाते. वांगी रोपे तयार झाली असल्यास रोपांची लागवड करावी व लागवडीच्या वेळेस प्रत्येकी ७५ किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी द्यावे.

मिरची 

वाढत्या तापमानामुळे मिरची या पिकावर लिफ कर्ल (चुरडा-मुरडा) हा विषाणूजन्य रोग व त्यासोबत  भूरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे.रसशोषक कीडी व रोगाच्या नियंत्रणाकरिता पुढील दोन फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने कराव्यात. फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी 

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ०.६ मिलि + मॅन्कोझेब २.५ ग्रॅम
फिप्रोनिल १.५ मिलि + डिनोकॅप १ मिलि. 

वेलवर्गीय भाजीपाला  (काकडी, भोपळा, कारली इ.)

सध्याच्या वाढत्या तापमानामुळे या वेलवर्गीय पिकांत पानांच्या शिरा पिवळ्या पडून, हळदू (यलो व्हेन मोझॅक) या रोगाचा प्रसार पांढरी माशी व तुडतुडे या किडींद्वारे होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर केवडा व भूरी रोगाचा प्रसार होण्याची शक्‍यता आहे. या रोग किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी. फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी

थायामेथोक्झाम ०.४ ग्रॅम + (मेटॅलॅक्झिल एम अधिक मॅन्कोझेब) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम.

गहू दाणे भरणे, चिकाची अवस्था

मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक असल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.१ ग्रॅम.

मका दाणे भरणे, चिकाची अवस्था

अमेरिकन लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी चार कामगंध सापळे लावावेत.
किडीच्या नियंत्रणाकरिता, फवारणी प्रति लिटर पाणी 
किडीच्या नियंत्रणाकरिता, फवारणी प्रति लिटर पाणी 
अळीच्या वाढीच्या सुरुवातीला (एक ते तीन अवस्था) अवस्थांमध्ये निंबोळी अर्क (५%) किंवा अझाडिरॅक्टीन (१० हजार पीपीएम) ५ मिलि. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ०.४  मिलि.

कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर मका पिकाचा हिरवा चारा लगेच जनावरांना खायला देऊ नये किंवा मुरघास बनविण्यासाठी वापरू नये.

टोमॅटो लागवड

सध्या बऱ्याच भागात टोमॅटोची लागवड चालू झालेली आहे. टोमॅटो पिकात पर्णगुच्छ (लिफ कर्ल) रोगाचा प्रसार पांढरी माशीमार्फत होतो आणि टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस फुलकिडे मार्फत होत असल्याने, या किडींचे नियंत्रण वेळीच करणे गरजेचे असल्याने रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून नायनाट करावा. सायॲण्ट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मिलि प्रति लिटर पाण्यातून आवश्यकतेनुसार फवारणी करावी.

फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, सायपरमेथ्रीन (१० ईसी) १ मिलि किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (२५ डब्लु.डी.जी.) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एस.सी.) ०.३ मिलि किंवा फ्लूबेंडायअमाईड (३९.३५ एस.सी.) ०.३ मिलि. 

संदर्भ – (ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, महाराष्ट्र )

हे देखील वाचा