तंत्रशुध्द पध्दतीने लागवड करुन घ्या हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल ज्वारीचे उत्पादन

sorghum

जळगाव : रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेण्यास शेतकर्‍यांची पहिली पसंती असते. खरीप ज्वारीच्या तुलनेत रब्बी ज्वारीच्या धान्याची, तसेच कडब्याची प्रत चांगली असल्यामुळे शेतकरी रब्बी ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. सुधारित तंत्राने ज्वारीची लागवड केल्यास कोरडवाहू हलक्या जमिनीवर हेक्टरी ८-१० क्विंटल, मध्यम जमिनीवर २०-२५ क्विंटल, भारी जमिनीवर २५-३० क्विंटल, तर बागायती ज्वारीचे ३०-३५ क्विंटल उत्पादन घेता येते. यामुळे सुधारित तंत्राने रब्बी ज्वारीची लागवड कशी करावी? याची तंत्रशुध्द माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

ज्वारीसाठी मध्यम ते भारी जमीन निवडावी, साधरणत: जास्त ओल असलेल्या जमिनीत रब्बी ज्वारीची पेरणी केल्यास त्याचा शेतकर्‍यांना फायदा होतो. १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत रब्बी ज्वारीची पेरणी करावी. रब्बी ज्वारीला हेक्टरी १० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक (३०० मेश पोताचे) चोळावे तसेच, २५ ग्रॅम अ‍ॅझोटोबॅक्टर व पी.एस.बी. जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. ज्वारीच्या अपेक्षित उत्पादनासाठी हेक्टरी रोपाची संख्या १.४८ लाख ठेवणे जरुरीचे आहे. त्यासाठी ज्वारीची पेरणी दोन ओळीत ४५ सें.मी. व दोन रोपांत १५ सें.मी. अंतर ठेवून करावी.

रब्बी ज्वारीसाठी खतांची योग्य मात्रा
कोरडवाहू रब्बी ज्वारीकरिता ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश (११० किलो युरिया + १५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट + ४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) हेक्टरी याप्रमाणे खत द्यावे. कोरडवाहू रब्बी ज्वारीला खताची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळीच द्यावी; परंतु जर रब्बी ज्वारी ओलिताखाली घ्यावयाची असेल, तर ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश (२०० किलो सुफला २० : २० : ० + ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश अथवा ८७ किलो युरिया + २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट + ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) हेक्टरी द्यावे. यापैकी ४० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीसोबतच द्यावे व उरलेली ४० किलो नत्राची मात्रा (८७ किलो युरिया) पीक पेरणीनंतर २५-३० दिवसांनी द्यावी. मृद चाचणीत आवश्यकता भासल्यास पालाशची मात्रा द्यावी.

रब्बी ज्वारीसाठी असे करा तण व्यवस्थापन
सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसांत पीक तणविरहित ठेवणे महत्त्वाचे असते. यासाठी कोळपणी २ ते ३ वेळा व खुरपणी एक वेळा करावी. ज्वारी पीकामध्ये अट्रॉझिन (५० टक्के डब्ल्यू. पी.) हे तणनाशक ०.५ ते १.५ किलो / हेक्टरी ७५० ते १००० लिटर पाण्यात पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी पीकात एकसमान फवारावे व वखराच्या पाळीने जमिनीत मिसळून घ्यावे किंवा २, ४-डी (सोडिअम सॉल्ट) (८० डब्ल्यू. पी.) हे तणनाशक ०.६२५ ते १ किलो / हे?टर ७५० ते १००० लिटर पाण्यात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी पीकामध्ये एकसमान फवारावे.
ज्वारीवर खोडमाशी, खोडकिडा, मावा, तुडतुडे, लाल कोळी आणि कणसातील अळ्या यासारख्या कीडरोगांचा प्रादुर्भाव होतो. एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर केल्यास किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खाली ठेवता येते. पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी साधारणपणे १० टक्केपर्यंत पोंगेमर आढळून आल्यास, एन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही १४ मि.लि. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी ज्वारीवर साधारणपणे दिसणारे रोग म्हणजे खडखड्या, पानावरील करपा, तांबेरा, चिकटा आणि काणी हे आहेत. काणीसाठी बियाण्यास गंधकाची प्रक्रिया करावी. त्यासाठी १ किलो बियाण्यास ३०० मेश गंधक ४ ग्रॅम याप्रमाणे चोळावे.

Exit mobile version