पुणे : अनेक शेतकरी पारंपारिक पिकपध्दतीची चौकट तोडून नवनवीन प्रयोग करण्याचे धाडस करतांना दिसत आहे. असेच नवे प्रयोग करणार्या शेतकर्यांसाठी अश्वगंधा लागवड हा निश्चितपणे फायदेशिर ठरु शकते. जगभरात औषधी वनस्पतींची मागणी वाढत आहे. भारतातही आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी औषधी वनस्पतींना जोरदार मागणी आहे. सर्व औषधी वनस्पतींपैकी अश्वगंधा ही सर्वात प्रसिद्ध वनौषधी मानली जाते. अश्वगंधा लागवडीतील बचत खर्चापेक्षा खूप जास्त आहे. यामुळे अनेक शेतकरी अश्वगंधा लागवडीकडे वळू लागले आहेत.
अश्वगंधाच्या लागवडीत भरपूर नफा मिळतो. अश्वगंधा या औषधाला सर्वाधिक मागणी असते. अश्वगंधाचे मूळ, पान, फळे आणि बीज औषधी म्हणून वापरतात. अश्वगंधाचे मूळ, पान, फळ आणि बिया औषध म्हणून वापरतात. आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याचा उपयोग होतो. अश्वगंधाला बाजारात मोठी मागणी असते शिवाय याला दर देखील अधिक मिळतो.
अश्वगंधा लागवड कशी करावी?
भारतात अश्वगंधाची लागवड हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, केरळ, आंध्र प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये केली जाते. मैदानी भागात त्याची पेरणी १५ ऑक्टोबर पासून सुरू होते. एका एकरासाठी सुमारे ६ किलो दर्जेदार बियाणे पुरेसे आहे. पोशिता, जवाहर असगंधा-२०, डब्लू एस-२० आणि डब्लू एस-१३४ या वाण भारतात आढळणार्या अश्वगंधाच्या सुधारित वाणांमध्ये चांगल्या मानल्या जातात. पेरणी करताना ओळ ते ओळ अंतर २५ सेमी ठेवावे. पेरणीनंतर ७-८ दिवसात बियाणे उगवतात. अश्वगंधाचे पीक १७० दिवसांत तयार होते.
अश्वगंधा लागवडीचा खर्च आणि उत्पन्न
एक एकरात अश्वगंधा लागवडीसाठी एकूण ५० हजार रुपये खर्च येतो. यामध्ये बियाणे आणि खतांची किंमत सुमारे ६५०० रुपये आहे. पिकाची तण काढणी, काढणी आणि उपटण्यासाठी एकरी सुमारे ४० हजार रुपये मजुरी दिली जाते. पीक बाजारात नेण्यासाठी काही खर्चही केला जातो. गेल्या हंगामात मध्य प्रदेशातील नीमच मंडईत अश्वगंधा मुळ्याचा भाव ३५ हजार रुपये क्विंटल होता. एका एकरात सुमारे ६ क्विंटल मुळे मिळतात, ज्याची किंमत २.१० लाख रुपये आहे. याशिवाय अश्वगंधाची जी पाने एक एकरात निघतात, त्यांची किंमतही २५ हजार आहे. अशाप्रकारे एक एकर अश्वगंधापासून २.३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.