शेत शिवार । नाशिक : इंजिनिअरींगचे शिक्षण घेतल्यानंतर पुणे-मुंबईमध्ये चांगल्या कंपनीत मोठ्या पॅकेजची नोकरी मिळविण्याचे बहुतांश तरुणांचे स्वप्न असते. मात्र नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एका आदिवासी पाड्यावर राहणार्या हर्षद थाविल (Harshad Thavil) एका तरुणाने कृषी पर्यटन केंद्राची स्थापना करत कमाई करण्याचा नवा मार्ग शोधला आहे. हर्षदने सुरु केलेले कृषी पर्यटन केंद्र परिसरातील पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
अलीकडच्या काही वर्षांमध्ये कृषी पर्यटन ही संकल्पना बर्यापैकी रुजू लागली आहे. नेमकी हीच बाब हेरुन हर्षद या तरुणाने गारमाळ गावात कृषी पर्यटन सुरू केले. नामशेष होणार्या रानभाज्याची लागवड केली. हळूहळू छोटे तलाव, विविध प्रकारची झाडे, गवतफुले, छोटीशी झोपडी असे उभारुन कृषी पर्यटन केंद्र तयार केले. तेथे त्याने कॉफी, कोको, अमेरिकन सुपरफूड अवाकाडो, लिची, ड्रॅगन फ्रुट, चिकू, पपई, फणस, सीडलेस लिंबू, थायलंड चेरी, गुलाबी फणस, सफेद जांभूळ, स्टार फ्रुट, एलिफंट अॅपल, पेरू, हापूस, सीताफळ, केळी आदी झाडांसह कमळ तसेच कुमुदिनीच्या वेगवेगळया १३ प्रकारांची लागवड केली.
कृषी पर्यटन केंद्रातील झाडांवर, भिंतींवर, विविध ठिकाणी वारली चित्रे काढून हा परिसर आकर्षकरित्या सजविण्यात आला आहे. उच्चशिक्षित तरुणाचा हा नवा प्रयोग अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आता हे कृषी पर्यटन केंद्र नावारुपाला आले असून अनेक कुटुंब तेथे आवर्जुन भेट देतात. नोकरीच्या मागे न धावता तसेच शेतीवर येणार्या नैसर्गिक आपत्तींवर मात करत हर्षदने केलेला हा प्रयोग निश्चितच कौतूकास्पद आहे.